अग्निशमन दलाच्या सुरक्षेबाबत पालिकेचा खेळ सुरूच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दलाच्या सुरक्षेबाबत पालिकेचा खेळ सुरूच

Share This
३८ टक्के कमी दराने खरेदी करणार सेफ्टी शूज
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मागील वर्षी अंधेरी येथील लोटस पार्क येथील लागलेल्या आगी मध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे गमबूट आगी मध्ये वितळल्याने गमबुटाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना आता पुन्हा अग्निशमन दलाच्या जवानांच्या सेफ्टी शूजसाठी पालिकेने ३८ टक्के कमी दराने सेफ्टी शूज विकत घेण्याचा प्रस्ताव स्थ्यी समिती पुढे आणण्यात आला आहे. 

अंधेरी येथील आगीनंतर अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेफ्टी शूजच्या दर्जाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आग विझवताना या शूज मुळे कर्मचाऱ्यांच्या पायाचा आगी पासून बचाव व्हावा, विजेचा झटका, तसेच पाण्यापासून कर्मचाऱ्यांचे पाय वाचवण्याचे काम हे सेफ्टी शूज करत असतात. अशा या महत्वपूर्ण असलेल्या सेफ्टी शूजच्या खरेदी मध्ये भ्रष्टाचार होत असल्याने आणि स्थायी समिती मध्ये चालणाऱ्या टक्केवारीमुळे अद्याप अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे या शूज मिळत नव्हते. 

अंधेरी येथील लागलेल्या आगी नंतर आणि नुकत्याच काळबादेवी येथील आगी नंतर कर्मचारी अधिकारी आगी मध्ये होरपळून निघाले असतानाही पालिकेला अद्याप अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दया आलेली नाही. संपूर्ण मुंबईला आगी पासून वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू द्याव्यात असे अजूनही पालिका प्रशासनाच्या मनात आलेले दिसत नाही. अग्निशमन दलाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत पालिकेने ८२८ रुपये दराने ११ हजार सेफ्टी शूज खरेदीचा प्रस्ताव आणला आहे. यासाठी पालिका  मे. राज्यस्थान युनिफॉर्म क्‍लोथिंग कंपनी कडून खरेदीपेक्षा ३८ टक्के कमी दराने ९१ लाख रुपयांना हे बूट विकत घेणार आहे. सेफ्टी शूज पुरवठा करण्यासाठी सहा कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. सर्वात कमी किमंत मे. राज्यस्थान युनिफॉर्म क्‍लोथिंग कंपनीने दिल्यामुळे या कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. 

मुंबई मध्ये लागणाऱ्या आगीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीच्या वस्तू व उपकरणे द्यावीत अशी मागणी होत असताना कमी किमतीत कमी दर्जाच्या वस्तू विकत घेतल्या जाणार असल्याने या प्रस्तावाला विरोध करणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिली आहे. दरम्यान विरोधी पक्ष प्रस्तावाला विरोध करणार असताना सत्ताधारी शिवसेना भाजपा बहुमताच्या जोरावर कमी किमतीत कमी दर्जाचे बूट विकत घेण्याचा प्रस्ताव मंजूर करतात का याकडे मुंबईकर आणि अग्निशमन दलाचे लक्ष लागले आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages