मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे बौद्ध प्राध्यापकाची उपासमार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2015

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे बौद्ध प्राध्यापकाची उपासमार

उपोषणाकडे सरकार, विद्यापीठाचे दुर्लक्ष 
मुंबई / अजेयकुमार जाधव
वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या बौद्ध समाजातील रमेश बाबुराव घेगडमल यांना पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोणत्याही महाविद्यालयात सामावून घेण्याचे आदेश देताना विद्यापीठाने गेल्या ३ वर्षे ९ महिन्यात त्यांच्या पदाला मान्यता दिलेली नाही. यामुळे घेगडमल कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत घेगडमल यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, कुलगुरू यांना पत्र देवून न्याय देण्याची मागणी केली केली होती. परंतू न्याय न मिळाल्याने घेगडमल यांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज येथे बौद्ध समाजातील रमेश बाबुराव घेगडमल हे सन २००० पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांनी एम. फील. ( इंग्रजी ) हि शैक्षणिक पात्रता मिळवूनही त्यांना बीजनेस कम्युनिकेशन या विषयाकरिता अपात्र ठरवण्यात आले.  घेगडमाल यांनी ऑगस्ट २०१० मध्ये विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे न्याय मागितला. विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती आणि व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१२ मध्ये घेगडमल यांना पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोणत्याही महाविद्यालयात सामावून घेण्याचे आदेश दिले. 

विद्यापीठाच्या आदेशाप्रमाणे घेगडमल यांना ऑक्टोबर २०१२ सहाय्यक प्राध्यापक म्हणून सामावून घेतल्याचे आंबेडकर महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तसा प्रस्ताव व आवश्यक असलेली कागदपत्रे ऑक्टोबर २०१२ मध्ये विद्यापीठाकडे दिली. विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती आणि व्यवस्थापन परिषदेने दिलेल्या आदेशा प्रमाणे घेगडमल यांना नियुक्ती देण्यात येवूनही पुन्हा याच समिती आणि परिषदेकडे प्रकरण पाठवण्यात आले. जुलै २०१४ मध्ये पुन्हा घेगडमल यांची नियुक्ती योग्य असल्याचे आदेश देण्यात आले. विद्यापीठाकडून घेगडमल यांची नियुक्ती योग्य असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप त्यांच्या पदाला मान्यता देण्यास विद्यापीठाकडूनच जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. 

सन २०१२ पासून गेल्या ३ वर्षे ९ महिन्यात पदाला मान्यता देण्यात आली नसल्याने घेगडमल यांना पगार देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेले ३ वर्षे ९ महिने घेगडमल यांना पगार मिळाला नसल्याने घेगडमल यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने घेगडमल यांनी १९ मे पासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे. आपल्याला न्याय मिळावा म्हणून घेगडमल उपोषण करत असले तरी गेल्या आठवडा भरात राज्य सरकार किंवा मुंबई विद्यापीठाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नसल्याने मुंबई विद्यापीठाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS