नालेसफाईचा गोलमाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईचा गोलमाल

Share This
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबल्याचे चित्र दिसते. दरवर्षी पाणी तुंबल्याने मुंबईकर जनतेला वाहतुकीचा खोळंबा, रस्त्यावर पाणी साचणे, ट्रेन बंद पडणे इत्यादी प्रकारांना सामोरे जावे लागते. पाणी साचल्याने पावसाळ्यात कित्तेक तास मुंबई शहर थांबलेले असते. यामुळे मुंबईचे व आपल्या देशाचे नुकसान होत असते याची जाण मुंबई महानगर पालिकेला नसल्याचे दिसत आहे. सालाबाद प्रमाणे पालिका प्रशासन नालेसफाईची जबाबदारी पूर्ण गांभीर्याने आणि देखरेख करुन पार पाडीत आहे.सुमारे ३४० किलोमीटर लांबीचे मोठे नाले आणि सुमारे ४५० किलोमीटर लांबीचे छोटे नाले तसेच रस्त्यालगतचे नाले यांची स्वच्छता करण्यात येत आहे. विविध प्राधिकरणांच्या हद्दीत असणाऱया नालेसफाई करताना त्यांची मंजुरी घेऊन व समन्वय साधून ही कामे करण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई योग्यरित्या पूर्ण होईल, याची पूर्वसज्जता करुन कामे होत असल्याने विहित उद्दीष्ट पूर्ण होईल, असा विश्वासही पालिका प्रशासनाने व्यक्त केला.

पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक असावा लागतो तसा वचक आहे दाखवण्यासाठी नाले सफाईची पाहणी केली जाते. अशी पाहणी केल्या नंतर सत्ताधारी शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे. तर नालेसफाईची कामे प्रशासन चांगल्यारितीने करीत आहेत. गतवर्षी ४० कंत्राटदार नेमण्यात आले होते, तर यंदा ही संख्या ५० कंत्राटदार इतकी आहे. यामुळे नालेसफाई वेगाने व योग्यरित्या होत आहे. मिठी नदी क्षेत्रातील गाळ काढण्याचे कामही महापालिका करीत असून इतर प्राधिकरणांच्या हद्दीतही नदीतून गाळ काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबईकरांना त्रास होणार नाही असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले आहे. दिनांक १५ एप्रिलपासून बृहन्मुंबई महापालिका हद्दीत पावसाळी नालेसफाई करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे ६५ टक्के नालेसफाई झाली आहे. प्रशासन चांगल्यारितीने काम करीत असून गाळ काढण्यात आलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी पुन्हा कचरा, अवजड वस्तू इत्यांदी टाकू नयेत व नाले स्वच्छ ठेवण्यास नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले आहे. ३१ मे पर्यंत पावसाळ्यातील निर्धारित ७० टक्के नालेसफाईचे उद्दीष्ट्य गाठले जाईल, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला. मुंबई लगतच्या इतर महापालिकांशीदेखील समन्वय राखून त्यांच्या हद्दीतील नालेसफाई योग्यरित्या झाल्यास पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडचण येणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्याशीदेखील संवाद साधण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे महापौरांनी सांगितले आहे.

एकीकडे सत्तेतील शिवसेना नालेसफाई बाबत संतुष्ट असताना सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाने नालेसफाईचा दौरा केला आहे. मुंबईतील नालेसफाईच्‍या कामाचे नियोजन महापालिका प्रशासनाने योग्‍य पध्‍दीने केले असले तरी कंत्राटदार गाळ काढून जी आकडेवारी सांगत आहेत. त्‍याची सत्‍यता त्‍यांच्‍या गाळ मोजण्‍याच्‍या काटयावर अवलंबून आहे. त्‍या काटयाचे फोन नंबर न लागणे,  पावत्‍या उपलब्‍ध न होणे यातून शंका घ्‍यावी अशी परिस्थिती दिसून येते आहेअसे सांगत मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी नालेसफाईची कामे करणाऱया कंत्राटदारांची कामे पारदर्शी नसून समाधान व्‍यक्‍त करावे अशी कामे झालेली नाहीत असेही त्‍यांनी सांगितले. नालेसफाईची कामे करताना कंत्राटदार गाळाची आकडेवारी जाहीर करतात. हा गाळ ज्‍या काटयावर मोजला जातो त्‍या काटयाबाबतच आमदार आशिष शेलार यांनी प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. त्‍यांनी या दौऱयात गाळ मोजण्‍याचा काटा व मोजणीच्‍या पावत्‍यांची कत्राटदारांकडे मागणी करून ती तपासून पाहिली. अनेक कंत्राटदरानं पावत्‍या दाखविण्‍यात असमर्थता दर्शविली. त्‍यामुळे कंत्राटदार  जी आकडेवारी देत आहे त्‍यावरच मुंबईकरांची पावसाळी सुरक्षा अलवंबून आहेयाबाबत महापालिका अधिकाऱयांनी लक्ष घ्‍यावे अशा सूचनाही आमदार शेलार यांनी आधिकाऱयांना केल्‍या. तर याबाबत स्‍थायी समितीच्‍या बैठकीत चर्चा करावी अशा सूचना त्‍यांनी भाजपाच्‍या पदाधिकाऱयांना दिल्‍या आहेत. 

यामुळे सत्ताधारी भाजपावाल्यांना नालेसफाईमध्ये जो गोलमाल दिसला तो शिवसेनेला का दिसला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये गेले २२ वर्षे शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे. या २२ वर्षात कधीही भाजपावाल्यांना नालेसफाईची पाहणी करावी असे वाटले नाही. गेल्या वर्षी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर येताच मुंबई महानगर पालिकेतही स्वबळावर आपला महापौर बसू शकतो अशी स्वप्न भाजपाला पडू लागली आहेत. याच कारणाने भाजपावाले निवडणूक दिड वर्षावर आली असताना आम्ही किती स्वच्छ आहोत. नालेसफाई बाबत आम्ही सगळे गैर प्रकार बाहेर काढत आहोत असे चित्र निर्माण करत आहे. स्थायी समिती मध्ये नालेसफाईची जी कंत्राटे दिली गेली ती भाजपावाल्यांच्या संमतीनेच दिली गेलीत मग भाजपावाल्यांना नालेसफाई योग्य होत नसल्याचे गेल्या २० - २१ वर्षात दिसले नाही का ? गेले २०-२१ वर्षे भाजपावाले दौरे न काढता नालेसफाई बाबत गप्प का राहिले ? निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही मुंबईकर जनते सोबत आहोत असे दाखवण्याचा हा प्रकार आहे का ? असे कित्तेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

मुंबई महानगर पालिकेने नालेसफाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या कामावरच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. पालिकेतील सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मधील आर्थिक टक्केवारीच्या सेटिंग मुळेच नालेसफाई योग्य रित्या होते कि नाही, किती टन गाळ काढला, तो कोणत्या गाडीने नेण्यात आला, ठरलेल्या ठिकाणी हा गाळ नेऊन टाकण्यात आला का याची पालिका अधिकारी आणि सत्ताधारी कधीही शहानिशा करत नाहीत. यामुळे मुंबईकरांकडून वसूल केलेल्या पैशाची उधळपट्टी होत आहे असेच म्हणावे लागेल. गाळ वाहून नेणाऱ्या गाड्यांची नेमकी माहिती मिळावी म्हणून गाड्यांवर जीपीएस प्रणाली लावल्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यावरही कंत्राटदारांनी उपाय शोधला आहे. जीपीएस यंत्रणा गाळ नेणाऱ्या गाडीतून काढून मोटारसायकल वर लावण्यात येते. हि मोटार सायकल गाळ काढणाऱ्या जागे पासून गाळ टाकण्याच्या जागे पर्यंत फिरवण्यात येते. यामुळे पालिकेच्या वातानुकुलीत कार्यालयात थंड हवेची मजा घेत बसलेल्या अधिकाऱ्यांना मात्र खूप चांगले काम होत असल्याचे दिसत असते. 

पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने गाळ काढलेल्या जागेपासून गाळ खाली केलेल्या जागे पर्यंत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्याचे दिसण्यात आलेले नाही. कंत्राटदाराची बिले मात्र ते देतील तितका टन गाळ काढला हे गृहीत धरून बसल्या जागी मंजूर केली जातात. मुंबईकर जनतेचे २५२ कोटी रुपये नालेसफाई झाली म्हणून कंत्राटदारांच्या खिशात घातले जात आहे. मुंबईकर जनतेचा हा पैसा कोणतीही शहानिशा न करता कंत्राटदारांना दिले जाण्याचे कारण म्हणजे पालिका अधिकाऱ्यांची ठरलेली टक्केवारी. हि टक्केवारी मिळवण्यासाठी कंत्राटदाराला खुश ठेवावे लागते. कंत्राटदाराला हवे तसे केले कि बिल मंजूर करताना अधिकाऱ्यांचेही खिसे गरम होत असतात. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी वर्षानुवर्षे चाललेल्या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यामधील असलेले साटेलोटे तुटले तरच योग्य रित्या नालेसफाई होऊ शकेल आणि मुंबईकर जनतेला पावसाळ्याचा खरा आनंद लुटता येईल. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages