अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे निधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2015

अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे निधन


मुंबई- काळबादेवी येथील गोकूळ निवास इमारतीला लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेले मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे रविवारी निधन झाले. अनेक दिवसांपासून नेसरीकर यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नेसरीकर यांच्या पश्चात आई, पत्नी जयश्री आणि मुलगा सिद्धांत असा परिवार आहे. दरम्यान, या दुर्घटनेत चार जिगरबाज अधिका-यांना गमावल्याने मुंबई अग्निशमन दलाला मोठा धक्का बसला आहे.

‘गोकूळ निवास’ इमारतीला ९ मे रोजी आग लागली होती. ती विझवताना मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर ५० टक्के भाजले होते. त्यांना तातडीने ऐरोलीच्या बर्न रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरूहोते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर त्वचारोपण शस्त्रक्रियाही झाली, मात्र त्यांच्या शरीरातील सर्व अवयव निकामी झाले होते. तसेच फुप्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. दरम्यान, उपचारादरम्यान रविवारी दुपारी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती नॅशनल बर्न रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुनील केसवानी यांनी दिली. नेसरीकरयांचे पार्थिव भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आणण्यात येणार आहे. त्यांना तेथे अखेरची मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी संजय राणे व भायखळा अग्निशमन केंद्राचे प्रमुख महेंद्र देसाई, सुधीर अमिन या अधिका-याचा मृत्यू झाला होता.
Sunil Nesarikar

Post Bottom Ad

JPN NEWS