पालिका मुख्यालयात घुसताच नेत्यांची पळापळ
मुंबई / अजेयकुमार जाधव
परेल बोगदा चाळीतील रहिवाश्यांनी आंदोलन उपोषण करूनही घरे मिळत नसल्याने, बिल्डरवर कारवाई होत नसल्याने आज बुधवारी पालिका मुख्यालयात स्थायी समिती अध्यक्षांच्या आणि स्थायी समिती बैठकीवेळी आंदोलन केल्याने या आंदोलनाची दाखल सर्वच राजकीय पक्षांना घ्यावी लागली. आंदोलकांनी स्थायी समितीसमोर केलेल्या घोषणा आणि आंदोलनामुळे सर्वच पक्षीय नेत्यांची पळापळ केली होती.
परेल बोगदा चाळ येथील रहिवाश्यांना बेघर करणाऱ्या घुसखोर बिल्डरवर कारवाई करावी, चाळी मधील रहिवाश्यांना याच जागी घरे मिळवीत इत्यादी मागण्यांसाठी ३० एप्रिल पासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या बोगदा चाळ मधील रहिवाश्यांनी महानगर पालिकेच्या आत घुसून स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांचं दालनासमोर आंदोलन केले. या वेळी फणसे यांच्या बरोबरच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. बोगदा चाळीतील रहिवाश्यांनी आंदोलन केले त्यावेळी स्थायी समितीची बैठक सुरु असल्याने या आंदोलनाकडे सर्व पक्षीय नगरसेवकांचे लक्ष केंद्रित होऊन विरोधी पक्ष नेते देवेद्र आंबेरकर, प्रवीण छेडा, मनसेचे संदीप देशपांडे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आंदोलन कर्त्यांना भेट घेतली. आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक आपल्या सोबत असून घुसखोर बिल्डरला हटवण्यासाठी, एलवाय रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वेळ पडल्यास आयुक्तांशी चर्चा करू असे आश्वासन विश्वासराव यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. सभागृह नेत्यांबरोबर विरोधी पक्ष नेते आणि गटनेत्यांनी आंदोलनकर्त्यांची आयुक्त अजोय मेहता यांची भेट घालून दिली.
परंतू आयुक्तांनी आधी उपोषण थांबवावे नंतर अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांच्याशी चर्चा करावी असा सल्ला दिला.यावेळी संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी आम्हाला नुसती आश्वासन नको असून न्याय हवा आहे, आमचा बिल्डरवर विश्वास नसल्याने आम्हाला आमची घरे पालिकेनेच द्यावीत. एल वाय त्वरित रद्द करावा आणि बोगदा चाळीच्या ठिकाणी सुरु असलेले बांधकाम त्वरित थांबवावे या भूमिकेवर रहिवाशी ठाम राहिल्याने सर्व पक्षीय नेत्यांची गोची झाली होती. दरम्यान संध्याकाळी सभागृह नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी आधी आंदोलन सोडले तरच बोलणी करू असे सांगून निघून गेल्या. श्रीनिवास मात्र आयुक्तांच्या दालनात उशिरा पर्यंत बसून होते. यामुळे उशिरा पर्यंत बोगदा चाळीतील रहिवाश्यांची श्रीनिवास यांच्याशी बोलणी झाली नसल्याची माहितीज्योती बडेकर यांनी दिली आहे. जो पर्यंत पालिका रहिवाश्यांना न्याय देत नाही तो पर्यंत आंदोलन आणि उपोषण मागे घेणार नसल्याचे ज्योती बडेकर यांनी सांगितले आहे.

