मुंबई / अजेयकुमार जाधव -
मागील वर्षी अंधेरी येथील लोटस पार्क येथील लागलेल्या आगी मध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे गमबूट आगी मध्ये वितळल्याने गमबुटाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हे प्रश्न बाजूला ठेवत स्थायी समितीमध्ये अनेक नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि पुरवठादार कंपनीची चौकशी करण्याची मागणी धुडकावून लावत सेफ्टी शूजसाठी पालिका प्रशासनाने आणलेला ३८ टक्के कमी दराचा प्रस्ताव शिवसेना व भाजपाने मंजूर केला आहे.
अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी ८२८ रुपये दराने ११ हजार सेफ्टी शूज खरेदीचा प्रस्ताव आणला होता. याबाबत स्थायी समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवीण छेडा यांनी मे. राज्यस्थान युनिफॉर्म क्लोथिंग कंपनी आणि आधीची ब्ल्याकलिस्ट केलेली राजस्थान इंटरप्रायझेस हि कंपनी एकच आहे. पालिका पुन्हा ब्ल्याकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्यात येत आहे असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी छेडा यांनी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी हे सेफ्टी बूट कोणासाठी आहे. ह बूट स्थायी समिती मध्ये आणून दाखवावेत, इतक्या कमी किमतीत बूट घेणार असणार तर त्याचा दर्जा कसा असेल असे प्रश्न उपस्थित केले. तर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हे बूट कर्मचार्यांना कि अधिकाऱ्यांना देणार असा प्रश्न उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सेफ्टी बूट पुरवठा करणारी कंपनी वेगळी असल्याचे सांगत विरोधी पक्षांची कंपनीच्या चौकशीची मागणी फेटाली. तसेच हे बूट अग्निशमन दलातील कर्मचारी परेडच्या वेळी वापरणार असल्याचा खुलासा केला. यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा यांच्या बहुमताच्या जोरावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ३८ टक्के कमी दारामध्ये ९१ लाख रुपयांना११ हजार बूट विकत घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

