बोगदा चाळीतील रहिवाश्यांच्या आंदोलनाकडे भ्रष्ट पालिकेचे दुर्लक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बोगदा चाळीतील रहिवाश्यांच्या आंदोलनाकडे भ्रष्ट पालिकेचे दुर्लक्ष

Share This
राज्य सरकार आणि मंत्र्यांच्या आदेशाला केराच्या टोपल्या 
रहिवाश्यांमध्ये तीव्र संतापाची लाट 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईच्या परेल येथील सुप्रसिद्ध अश्या बोगदा चाळीतील रहिवाश्यांना हक्काची घरे मिळावीत म्हणून रहिवाशी गेले कित्तेक वर्षे लढा देत आहेत. रहिवाश्यांनी लढा देवूनही मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला पाठीशी घालत रहिवाश्यांना बेघर केले आहे. बोगदा चाळीतील रहिवाश्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून ३० एप्रिल पासून वाघिणी या संघटनेकडून किशोर जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु असले तरी पालिका अधिकारी आणि राज्य सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने रहिवाशी आणि आंदोलन कर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती बडेकर यांनी दिली. 

बोगदा चाळीतील ९० टक्के रहिवाश्यांना अमान्य असलेल्या विकासक मे. स्पी रिलल्टर यांना पालिका प्रशासनाने पाठीशी घालून बेकायदेशीर पणे इरादापत्र जारी केले आहे. बोगदा चाळीचे क्षेत्रफळ ४००० चौरस मीटर पेक्षा जास्त असताना ३३(९) नुसार पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने ११ / ९ / २०१४ रोजीच्या पत्रानुसार बोगदा चाळीचा प्रकल्प ३३(९) नुसार राबवता येणार नसल्याचे पालिका आयुक्तांना कळविले आहे. असे असतानाही पालिका आयुक्त आणि प्रशासनाने विकासकाला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याने रहिवाश्यांना अद्याप त्यांची हक्काची घरे मिळालेली नाहीत. याबाबत रहिवाश्यांचे आंदोलन सुरूच असल्याने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शिष्टमंडळाला भेट देवून रहिवाश्यांना नको असलेला विकासक स्थानिक मराठी म्हणवणारे पुढारी आणि पालिका प्रशासन जबरदस्ती थोपवत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत बेघर रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात घराची तातडीने सोय करावी असे निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. गृहनिर्माण मंत्र्यांनी दिलेले आदेशही पालिका आयुक्त आणि प्रशासन मनात नसल्याने रहिवाश्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यमंत्री रवींद्र वायकर, मिलिंद नार्वेकर यांच्या आशिर्वादाने भ्रष्ट पालिका अधिकारी संजय कुऱ्हाडे, स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे, पोलिस अधिकारी सुनील तोंडवळकर यांच्या सहाय्याने अनधिकृत विकासकाला साथ देवून २०५ कुटुंबियांना बेघर करत बोगदा चाळ उध्वस्त केली आहे. विकासकाला फायदा करून देणाऱ्या पालिका अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी ज्योती बडेकर यांनी केली. आझाद मैदानात आंदोलन सुरु असताना बोगदा चाळीच्या ठिकाणी मात्र विकासकाचे दिवस रात्र काम सुरु आहे. विकासकावर कोणतीही कारवाई होत नसल्याने बडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी रहिवाश्यांना न्याय न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बडेकर यांनी दिला आहे. 

राज विरोधात आंदोलन 
बोगदा चाळीतील रहिवाश्यांनी काही दिवसा पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. या भेटी दरम्यान राज यांनी कारवाई  करण्याचे आश्वासन रहिवाश्यांना दिले होते. राज ठाकरे यांच्या भेट घेवून ८ ते ९ दिवस झाले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आझाद मैदानात आंदोलन आणि उपोषण सुरु असताना, मराठी माणसाची फसवणूक सुरु असताना विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेटी दिल्या. परंतू राज ठाकरे यांनी साधी विचारपूस पण केली नाही. उलट माणसांना आपल्या गाडी खाली चिरडून मारणाऱ्या सलमान खानची घरी जाऊन भेट घेतली. याबाबत रहिवाश्यांनी संताप व्यक्त करत राज ठाकरे यांच्या विरोधात आझाद मैदानात आंदोलन केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages