सायन हॉस्पिटलमध्ये तब्बल चार तास काम बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सायन हॉस्पिटलमध्ये तब्बल चार तास काम बंद

Share This
सायन हॉस्पिटलमधील पेशंटच्या नातेवाईकांनी एका सफाई कामगाराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी हॉस्पिटलच्या सफाई कामगारांनी संप पुकारला. यामुळे हॉस्पिटलमधील सफाईचे काम तब्बल चार तास पूर्ण बंद पडले. अखेर आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यावर तसेच सुरक्षारक्षक वाढवल्यानंतर संप मागे घेतला. हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षकांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन खासगी सुरक्षारक्षक तातडीने नेमण्याचा निर्णय झाला. 

सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याची गेल्या पाच महिन्यांतील ही चौथी घटना आहे. वॉर्ड क्रमांक सहामधील सफाई कामगार प्रदीप गवारे सोमवारी रात्रपाळीला आला, तेव्हा एका पेशंटचा डायपर बदलण्यासाठी नातेवाईक आग्रह करीत होते. पण प्रदीप कपडे बदलण्यासाठी गेला होता. त्यात काही वेळ गेला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. प्रदीप वॉर्डमध्ये आल्यावर नातेवाईकांनी त्याला जाब विचारला. त्यातून वाद होऊन नातेवाईकांनी प्रदीपला मारहाण केली. वॉर्डमधील नर्सने मध्यस्थी केली, तेव्हा तिलाही धक्काबुक्की केली. अखेर सुरक्षारक्षक आले. नातेवाईकांनी माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटले.

मंगळवारी सकाळी प्रदीप कामावरून घरी जाण्यास निघाला तेव्हा पेशंटच्या नातेवाईकांनी. 'तू घरी कसा जातो ते पाहतो' अशी धमकी दिली. त्यातून प्रकरण पुन्हा पेटले. सकाळी कामावर आलेल्या सफाई कामगारांना ही घटना समजल्यावर सर्वांनी काम बंद केले. दोनशे ते अडीचशे सफाई कामगार हॉस्पिटलच्या आवारात जमा झाले. म्युनिसिपल मजदूर युनियन व शिवसेनेची कामगार संघटना यामध्ये सहभागी झाली. प्रकरण चिघळल्यावर डीन डॉ. सुलेमान मर्चंट यांनी युनियनचे प्रतिनिधी, सुरक्षा अधिकारी व पोलिसांची तातडीने बैठक बोलावली. जोपर्यंत आरोपींच्या विरोधात एफआयआर होत नाही व सुरक्षारक्षक वाढवले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका युन‌यिनचे नेते अॅड. एम. नवनाथ व प्रदीप नारकर यांनी घेतली. अखेर आरोपी कल्पेश काशीनाथ कोळी व भावेश कोळीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. सुरक्षारक्षक कमी असल्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने ४० खासगी सुरक्षा रक्षकांची टीम बोलावली. काळ्या गणवेशातील खासगी रक्षक काही तासांतच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यापुढे तीन खासगी सुरक्षारक्षक व दोन पालिकेचे सुरक्षारक्षक असे पाच जणांचे पथक हॉस्पिटलमध्ये गस्त घालणार आहे. या संपामुळे वॉर्डातील सफाईचे कामकाज ठप्प झाले होते. पण ऑपरेशन थिएटर व ईमर्जन्सी वॉर्डमधील सफाई कामगार यामध्ये सहभागी झाले नव्हते, असा दावा युनियनने केला.

रिक्त पदे
हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षकांची १३१ मंजूर पदे आहेत. त्यातील ३३ पदे रिक्त आहेत. तर तीन अधिकारी पालिकेच्या भांडुप कॉम्प्लेक्समध्ये प्रशिक्षण देण्यासाठी गेले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages