मुंबई / अजेयकुमार जाधव
परेल बोगदा चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांच्या बुधवारच्या आंदोलनामुळे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी चाळीच्या ठिकाणी भेट देण्याचे आणि बिल्डरचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर पालिका अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधार्यांनी इमारतीच्या ठिकाणी भेट दिली असली तरी विकासकांच्या कार्यालयात बसून विकासकांची बाजू घेतल्याने सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बोगदा चाळीतील रहिवाश्यांच्या तोंडाला पाने फुसली अशी प्रतिक्रिया वाघिणी संघटनेच्या अध्यक्षा ज्योती बडेकर यांनी दिली आहे.
बुधवारी स्थायी समितीच्या बैठकी बाहेर बोगदा चाळीतील रहिवाश्यांनी आंदोलन करून सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाला जाग आणली होती. रहिवाश्यांच्या या आंदोलनानंतर जाग्या झालेल्या शिवसेना नेते आणि अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी तातडीने बैठक घेवून गुरुवारी बेकायदेशीर बिल्डरचे बांधकाम थांबवण्याचे, इमारतीच्या जागेचे बंद केलेले गेट उघडे करण्याचे, बिल्डरने अनधिकृत रित्या बांधलेले कार्यालय तोडण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्या प्रमाणे गुरुवारी सकाळी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव चाळीच्या ठिकाणी भेट देण्यास गेल्या असत्या पालिकेचा मालमत्ता विभागाचा फक्त एकाच अधिकारी उपस्थित होता. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि सभागृह नेत्यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे बिल्डरच्या कार्यालयावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे सत्ताधारी शिवसेना, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि पालिका प्रशासना विरोधात रहिवाश्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनाही संबंधीत बिल्डर भिक घालत नसल्याचे या भेटी दरम्यान समोर आले आहे. शिवसेना या बिल्डरच्या पाठीशी आहे का असा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. मराठीचे नाव घेवून शिवसेना मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे का असे प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात ३० एप्रिल पासून सुरु असलेले किशोर जगताप यांचे आमरण उपोषण स्थगीत करण्यात आले असून आंदोलन तीव्र करत आझाद मैदानात साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे ज्योती बडेकर यांनी सांगितले.

