मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखड्यामुळे पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांची उचलबांगडी झाल्या नंतर त्यांच्या जागी आलेल्या अजोय मेहता यांनी पालिकेतील अधिकाऱ्यामध्ये आलेली मरगळ साफ करायला सुरुवात केली आहे. पदाचा कार्यभार स्वीकारताच पावसाळी पूर्व कामाची आढावा बैठक मेहता यांनी घेतली. या बैठकीत पावसाळ्यातील परिस्थितीचा आढावा मेहता यांनी घेताना तुमच्या समस्या काय आहेत त्या आताच सांगा नंतर कारणे देवू नका असे अधिकाऱ्यांना मेहता यांनी सुनावल्याची चर्चा आहे.
पावसाळ्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मेहता हे गप्प बसले नाहीत. शनिवारी ( २ मे ) पालिकेतील सर्व अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख यांची सकाळी १० वाजल्या पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्यारेथॉन बैठक घेतली आहे. मुंबईमध्ये दर वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबते, पाणी तुंबल्याने मुंबईमध्ये ट्राफिक जाम, ट्रेन बंद पडून मुंबईकर नागरिकांचे नुकसान होते. मुंबईकर नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेवून 'या वर्षी नालेसफाईनंतर काठावरील गाळही दिसता कामा नये, त्याची त्वरित विल्हेवाट लावली पाहिजे, असे आदेशही आयुक्तांनी दिले.
यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबणारे ४0 'स्पॉट्स' असून तत्पूर्वी नालेसफाई चांगली झाली पाहिजे. सफाईनंतर काठावर टाकण्यात येणार्या गाळाची त्वरित विल्हेवाट करण्यात यावी, ४0 ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता असल्यामुळे तेथे तुंबणार्या पाण्याचा त्वरित उपसा करून मुंबईकरांना कमी त्रास होईल, याची दक्षता घेण्याचेही आदेश मेहता यांनी दिले .प्रत्येक वरिष्ठ अधिकार्याने त्यांना नेमून दिलेले काम पारदर्शक व सचोटीने केले पाहिजे असे मेहता यांनी सांगितले आहे. मुंबईकरांना चांगल्या सेवासुविधा देण्याची जबाबदारी पालिकेच्या वार्ड मधील सहाय्यक आयुक्तांची आहे असेही मेहता यांनी सुनावले आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांना मिळणार्या नागरी सेवा-सुविधांचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी आणि चांगले जनहित ठेवण्याच्या केंद्रस्थानी सहाय्यक आयुक्त असून विभागीय सहाय्यक आयुक्तांनी आपापली सर्व कामे सचोटीने व पारदर्शकतेने केली पाहिजेत, ही कामे करताना त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तसेच सर्व सहाय्यक आयुक्तांचा अनधिकृत बांधकामे करणार्यांवर धाक असलाच पाहिजे, असे काम त्यांनी करावे, बेकायदा बांधकामांना अजिबात थारा देऊ नये, पालिका प्रशासानाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडल्यास आणि त्यात पारदर्शकता असल्यास लोकांचा पालिकेविषयी असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलेल, सर्वसामान्य माणूस पालिकेबद्दल सकारात्मक आहे, असेही निदर्शनास येईल, असा विश्वासही आयुक्तांनी या वेळी व्यक्त केला.
पावसाळ्यात कावीळ, डेंग्यू आणि मलेरिया यांच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी सर्व विभागांचे उपायुक्त, खातेप्रमुख यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मेहता यांनी करून, सहाय्यक आयुक्तांनी त्यांना नेमून दिलेल्या भागात सूक्ष्म नजर ठेवावी आणि लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असेही आयुक्तांनी या बैठकीत सांगितले आहे.अतिधोकादायक इमारती पाडण्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिली असल्यास, तेथे राहणार्यांच्या जीविताला धोका आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे आणि अतिधोकादायक बांधकामे पाडण्याची अनुमती द्यावी, अशी विनंतीही न्यायालयाला संबंधित अधिकार्यांनी करावी. तसेच अतिधोकादायक इमारतींमध्ये लोकांनी राहू नये, त्यांच्या प्रबोधनासाठी याबद्दल माहिती द्यावी, असेही मेहता यांनी सांगितले आहे.
मुंबईतील पावसाळापूर्व नालेसफाई, सफाईनंतरही त्यांच्या काठावर तसाच ठेवलेला गाळ, अनधिकृत बांधकामे, पावसाळ्यात अतिधोकादायक ठरणार्या इमारती, पावसाळ्यात कावीळ, डेंग्यू व मलेरियाचा होणारा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजना, वरिष्ठ अधिकार्यांचे त्यांच्या सहकारी कर्मचार्यांशी आवश्यक असलेले सौहार्दपूर्ण संबंध या महत्त्वाच्या मुद्दय़ांविषयीया बैठकीत सखोल ऊहापोह करण्यात आला आहे. आयुक्तांच्या या बैठकीत विभागातील अनधिकृत बांधकामे रोखायचे आयुक्तांनीच आदेश दिल्याने सर्वच सहाय्यक आयुक्तांचे बाहेरचे उत्पन्न बंद होणार असल्याने सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आयुक्तांनी लोकांच्या हिताचे निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावेत असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पालिकेतील अधिकाऱ्यांना गेल्या काही वर्षात लोकांच्या हिताचे निर्णय काय असतात याचा विसर पडून हे अधिकारी बिल्डर आणि विकासक यांच्या ताटा खालचे मांजर होऊन बसले होते. अश्या पालिका अधिकाऱ्यांना आयुक्तांनी तुम्ही लोकांचे सेवक असल्याची जान करून दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात मुंबईकर नागरिकांच्या हिताचा पालिका अधिकारी विचार करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी साचू नये असे आदेश दिल्याने मुंबईमध्ये पाणी साचणार नाही अशी परिस्थिती नाही. मुंबईची भौगोलीक स्थिती पाहता ते शक्यही नाही. परंतू पालिका अधिकाऱ्यांनी कंत्राटदारावर मेहरनजर न होता कंत्राटदाराकडून चांगले काम करून घेतल्यास मुंबईकर नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास मात्र कमी करता येवू शकतो.
असो पालिका आयुक्त अजोय मेहता हे पालिकेचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त मेहता यांची नियुक्ती करताना २०१७ च्या पालिका निवडणुकीचे मिशन दिले आहे. सन २०१७ च्या पालिकेच्या निवडणुका पाहता मेहता यांना मुंबईकर नागरिकांना पालिका किती चांगली सेवा देवू शकते हे दाखवून द्यावे लागणार आहे. मुंबईकर नागरिकांना येत्या २०१७ पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत खुश ठेवून चांगले निर्णय घेण्याची जबाबदारी मेहता यांच्यावर आहे. हि जबाबदारी मेहता योग्य रित्या पार पाडताना दिसत आहे. मेहता यांच्या सुरु असलेल्या कामाच्या पद्धतीमुळे येणाऱ्या काळात मुंबईकर नागरिक नक्कीच खुश होतील अशी शक्यता वर्तवायला हरकत नाही.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१३६३
.jpg)


No comments:
Post a Comment