पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर ५४२ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर ५४२ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या

Share This

मुंबई (प्रतिनिधी) -मुंबई महानगर पालिका प्रशासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४ च्या तरतुदी अन्वये मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ५४२ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यात खाजगी, महापालिका, म्हाडा आणि शासकीय इमारतींचाही समावेश असून पालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक इमारतीं ठावून घरे खाली करावी असे आवाहन पालिकेने केले असल्याने आता जायचे कुठे असा प्रश्न या इमारतीमधिल रहिवाश्यांना पडला आहे.


पालिकेने ३२ हजार ४२९ इमारती ३० वर्षा पेक्षा जुन्या असल्याचे जाहीर करताना ५४२ इमारती अतिधोकादायक ठरवल्या  आहेत. त्यापैकी कुर्ला ‘एल’ वॉर्डात सर्वाधिक ११६,घाटकोपर एन विभागातील  ६६, के पूर्व विभागातील ४६, के पश्चिम विभागातील ३५, आर मध्य विभागातील ३८, आर दक्षिण विभागातील २३ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारतींतील रहिवाशांना जागा सोडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतर अनेकांनी घरे रिकामी केली मात्र काही इमारतींत अजूनही लोक राहत असून त्यांनी तत्काळ इमारतींचा ताबा सोडावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
या धोकादायक इमारतींतील रहिवाशांना इमारत सोडण्याचे आवाहन करताना या रहिवाशांच्या जबाबदारीबाबत कानाला हात लावले आहेत. इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही. तुमच्या जबाबदारीवर इमारतीत रहा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

गेल्या वर्षी या महापालिकेने १३,७७९ इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावेळी मुंबईतील ५९३ इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या होत्या. यंदा ५४२ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. म्हणजेच यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ५१ने घटली आहे. एकीकडे धोकादायक इमारतींची संख्या ५१ ने घटली असली तरी ‘एल’ वॉर्डात मात्र धोकादायक इमारतींची संख्या १६ ने वाढली आहे. मागच्या वर्षी ‘एल वॉर्डात १०० तर यंदा ११६ इमारती धोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages