मुंबई / प्रतिनिधी - काळबादेवीतील अग्नितांडव विझविताना शहीद झालेले सुधीर अमीन यांच्या कुटुंबीयांनी मुंबई पालिकेने दिलेली नुकसान भरपाई नाकारली आहे. महापौर स्नेहल आंबेकर आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव त्यांना मदतीचा धनादेश देण्यासाठी गेले हाेते. अमीन यांची उपप्रमुख अग्निशमन अधिकारी या पदावरील पदोन्नती ९ महिने का रखडवली, असा सवाल अमीन यांच्या पत्नी शर्मिला यांनी केला.
शहिदांच्या कुटुंबाला मिळणारी भरपाई पदोन्नतीच्या नियमांना धरून का दिली जात नाही, असा प्रश्न करत त्यांनी मदत नाकारली. अमीन यांना शहीद म्हणून घोषित करावे, अशी मागणीही शर्मिला यांनी केली. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी चाेख कामगिरी केल्यामुळे अमीन यांना राष्ट्रपतिपदकाने गाैरविण्यात आले हाेते. मात्र, अजूनही या कुटुंबाला मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळालेले नाही. जोपर्यंत कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत नुकसान भरपाई घेणार नाही, असा इशारा शर्मिला यांनी महापाैरांना दिला.

