कंत्राटदारांची नालेसफाईच्या नावाने हात सफाई - 291 कोटीचा भ्रष्टाचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2015

कंत्राटदारांची नालेसफाईच्या नावाने हात सफाई - 291 कोटीचा भ्रष्टाचार


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भ्जापाचे मुंबई अध्यक्ष आमदार विनोद शेलार यांनी मुंबईमधील नालेसफाई १०० टक्के झाली असून नालेसफाई बाबत आपण खुश असल्याचे म्हटले होते. एकीकडे सत्ताधारी आणि प्रशासनाकडून नालेसफाईचा दावा केला जात असतानाच हि नालेसफाई बोगस असल्याचा भांडाफोड काँग्रेसचे नगरसेवक मोहसीन हैदर यांनी केला आहे. नालेसफाईच्या नावाने २९१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून पालिकेने नालेसफाई न करता हात की सफाई केल्याचे हैदर यांनी पत्रकारांना सांगितले.

मुंबई महानगर पालिकेने मुंबईमधील नालेसफाई करण्यासाठी २९१ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. मुंबई मध्ये डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्याने कंत्राटदारांनी स्वतः मुंबई बाहेरील डम्पिंग ग्राउंड शोधावे, त्या जमीन मालकाची तसेच इतर ग्रामपंचायत, पंचायत किंवा जिल्हा परिषदा यांचे ना हरकत प्रमाण पत्र सादर करावे अशी अट घालण्यात आली होती. सदर अटी नुसार कंत्राटदरानी जमीन मालकाची तसेच इतर ग्रामपंचायत, पंचायत किंवा जिल्हा परिषदा यांचे ना हरकत प्रमाण पत्र सादर करून कंत्राटे मिळवली. परंतू या कंत्राटदारांनी गाळ कुठे गेला याची चौकशी केली असता कंत्राटदारांनी दिलेली ना हरकत पत्र बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. कंत्राटदारांनी कंत्राटे मिळवण्यासाठी  मानकोळी, उलवे, जासई, वैशवी, दिवे ( अंजूर ), सुंरई सारंग या बोगस लेटरहेड, सही, शिक्के तसेच पालिकेच्या ऐरोली येथील ऑक्टराय नाक्यावर कर्मचारी असलेल्या नरेश केणीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे सादर केल्याचे हैदर यांनी सांगितले. कंत्राटदारांनी बोगस कागदपत्रे सादर करून कंत्राटे मिळवली असल्याने सर्व कंत्राटदारांची चौकशी करावी, त्यांची बिले अदा करू नयेत अशी मागणी हैदर यांनी केली. काही कंत्राटदारांनी एकाच ना हरकत प्रमाणपत्रावर आपले नाव टाकून कंत्राटे मिळवल्याचेही हैदर यांनी सांगितले. मुंबई मध्ये आणि मुंबई बाहेर कंत्राटदारांना डम्पिंग ग्राउंड मिळालेच नसल्याने मुंबई महानगर पालिकेकडून केला जाणारा १०० टक्के नाले सफाईचा दावा खोटा असून ६ टक्केही नाले सफाई झाला नसल्याचे हैदर यांनी सांगितले. मुंबई महानगर पालिकेत कंत्राटदारांनी गाळ न काढता २९१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याने आयुक्तांनी या प्रकरणाची लाच लुचपत विभाग, सीबीआयकडून तसेच एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करावी अशी मागणी हैदर यांनी केली. नाले सफाईमध्ये भ्रष्टाचार होत असल्याने पालिकेने नाल्यात गाळ आणि कचरा जाऊच नये म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती कारवाई अशी मागणी हैदर यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS