लोकल मार्गाची श्‍वेतपत्रिका तयार - प्रभू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकल मार्गाची श्‍वेतपत्रिका तयार - प्रभू

Share This

मुंबई : मुंबईतील लोकलच्या मार्गाचा सर्वांगीण आढावा घेणारी श्‍वेतपत्रिका रेल्वे मंत्रालयाने तयार केली आहे. त्यात लोकांचा सहभाग असण्यासाठी ही श्‍वेतपत्रिका मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सर्वांसाठी खुली केल्यास त्यात प्रवाशांचेही प्रतिबिंब झळकेल, असा विश्‍वास रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 
मध्य रेल्वेवरील डीसी-एसी विद्युत परिवर्तनाचा लोकार्पण सोहळा वांद्रे येथे प्रभू यांच्या हस्ते आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. मुंबई आणि परिसरातील ७५ लाख प्रवासी दैनंदिन स्तरावर लोकलने प्रवास करतात. त्यांना रोज भेडसावणार्‍या सूचना, अडचणी व समस्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने श्‍वेतपत्रिका तयार केली आहे, मात्र त्यात विविध व परिवहन क्षेत्रातील लोकांचा, प्रवाशांचा सहभाग असणे आवश्यक आहे व ही श्‍वेतपत्रिका सर्वांसाठी खुली करण्याची सूचनाही प्रभू यांनी करताना, ही पत्रिका अशा प्रकारे सादर केल्यास त्यामध्ये प्रवाशांचेही प्रतिबिंब नक्की झळकेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ही श्‍वेतपत्रिका विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना व प्रवाशांना पाहता येईल यासाठी संकेतस्थळ निर्माण करून, त्यावर विविध सूचना टाकण्याची व्यवस्थाही करावी, असे आवाहन रेल्वे मंत्र्यांनी या वेळी एमआरव्हीसीच्या प्रमुखांना केले. ही श्‍वेतपत्रिका जुलैमध्ये प्रकाशित होणार आहे.

दुहेरीकरण, विद्युतीकरण कोकण रेल्वेने स्वबळावर करावेकोकण रेल्वेवर वाहतुकीचा आणि प्रवाशांचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाची मागणी प्रलंबित आहे, याकडे प्रभू यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, 'कंपनी कायद्यांतर्गत कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झाली आहे. ही कंपनी असल्याने त्यांचे स्वतंत्र संचालक मंडळ असल्याने त्यांनीच या सुविधा उचलण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. पण 'कोरे'चा आर्थिक फायदा फारच तुटपुंजा असताना, ते दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासाठी लागणारा मोठा निधी स्वतंत्रपणे कसा उभारू शकतील, असा प्रतिप्रश्न वार्ताहरांनी केला असता, 'कोरे'चे स्वतंत्र संचालक मंडळ असल्यामुळे महामंडळानेच स्वत:च्या बळावरच आर्थिक जबाबदारी उचलणे आवश्यक आहे, असे प्रभू यांनी स्पष्ट सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages