मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईच्या महापौर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वेळोवेळी चांगल्याच गोत्यात आल्या असतानाही त्यानी आपली वादग्रस्त वक्तव्य करण्याची परंपरा अजूनही सुरु ठेवली आहे. मुंबई महानगर पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती दुर्दैवी असल्याचे वक्तव्यकरून महापौरांनी पुन्हा वाद निर्माण करून घेतला आहे. मुंबईच्या प्रथम नागरिक व मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिकेतील १० वी पास विद्यार्थ्यांचा सत्कार करताना केले आहे. मुंबईच्या महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी बोलावलेल्या कार्यक्रमात महापौरांनी असे विधान केल्याने कार्यक्रम संपल्या नंतर उपस्थितांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु होती. तर पालिकेतील गरीब विद्यार्थ्यांच्या परिस्थितीला दुर्दैवी म्हटल्याने महापौरांच्या वक्तव्याविरोधात पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमधील इयत्ता १० वीच्या परीक्षेमध्ये ९० टक्क्याहून अधिक मार्कस मिळवणाऱ्या २४ विद्यार्थ्यांचा सत्कार पालिकेच्यावतीने मंगळवारी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात करण्यात आला. ९० टक्क्याहून अधिक मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेला हातभार लागावा म्हणून प्रत्तेकी ५ हजार रुपये पुरस्कार म्हणून देण्यात आले. तसेच ९० ते ९४ टक्के मिळवणाऱ्या शाळांना २० हजार तर ८५ ते ९० टक्के मिळवणाऱ्या शाळांना १५ हजार रुपयांचा पुरस्कार म्हणून देण्यात आला. यावेळी बोलताना मी सुद्धा पालिका शाळेतील विद्यार्थी आहे. पालिका शाळेतील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. एकीकडे पालिकेच्या शाळा बंद होत असताना पालिका शाळांचा चांगला निकाल लागल्याने लोकांमध्ये चांगला संदेश जाईल असे आंबेकर यांनी सांगितले. पालिका शाळांचा निकाल पाहून विद्यार्थ्यांनी पालकांनी पालिका शाळांबाहेर रांग लावली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करण्याचे आवाहन आंबेकर यांनी यावेळी केले. शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी पुढच्या वर्षी ९० टक्क्याहून अधिक मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचे आवाहन केले.
लेट लतीफ पदाधिकारी
पालिकेकडून दरवर्षी १० वि पास विद्यार्थ्यांचा सत्कार करते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पालिकेच्या वतीने सत्कार करावयास बोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्यात आले. ३ वाजता होणाऱ्या सत्कार कार्यक्रमाला ३ वाजून ३० मिनिटांनी शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे आल्या परंतू कोणीही महत्वाच्या व्यक्ती आल्या नसल्याने त्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन बसने पसंद केले. शिक्षण समिती उप आयुक्त रमेश पवार हे ३. ४६ वाजता आले. पक्ष कार्यालयात गेलेल्या तावडे या ३.५१ मिनिटांनी परत कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या. तर मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्यासोबत ३.५४ मिनिटांनी आल्यावर कार्यक्रम एक तास उशिरा सुरु करण्यात आला. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वेळेवर आल्या नंतरही प्रमुख पाहुणे व लोकप्रतिनिधी उशिरा आल्याने कार्यक्रम उशिरा चालू झाला. विद्यार्थी आणि पालकांना गृहीत धरून दरवर्षी कार्यक्रमाला उशिरा येण्याची परंपरा चालूच ठेवल्याचीचर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरु होती.

