मालाड - मालवणीतील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या जागेवरील ४५० अतिक्रमणावर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2015

मालाड - मालवणीतील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या जागेवरील ४५० अतिक्रमणावर कारवाई


मुंबई / प्रतिनिधी - मालाड (पश्चिम) येथील मालवणी परिसरातील महापालिकेच्यावतीने प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या जागेवरील सुमारे ४५० अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई महापालिकेने वन खात्याच्या सहकार्याने केली. संबंधित अतिक्रमितांच्या तीव्र विरोधाचा सामना करुन ही कारवाई पार पाडण्यात आली असून सदर जागेचे रक्षण करण्यासाठी तेथे संरक्षक भिंत बांधण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. 

पी / उत्तर विभागातील मालाड (पश्चिम) येथील मालवणी परिसरात लगून रस्त्यावर महापालिकेच्यावतीने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याकरीता भूखंड आरक्षित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची क्षमता सुमारे ८५० एमएलडी इतकी असून ४५ एकर राखीव भूखंडापैकी प्रत्यक्षात ३५ एकर क्षेत्रावर प्रकल्प उभारला जाणार आहे. दहिसर ते गोरेगांव या परिसरातील सांडपाणी जोडरस्त्याखाली (लिंक रोड) बोगद्यामध्ये संकलित करुन ते या प्रक्रिया केंद्रात आणण्यात येईल. तेथे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावित ४ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून हे पाणी समुद्रात सोडण्यात येणार आहे. याकरीता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेले निकष पाळण्यात येत आहेत.. 

सदर सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या राखीव भूखंडावरील अतिक्रमणे हटवून तेथे संरक्षक भिंत बांधून महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने वन खात्याच्या सहकार्याने कार्यवाही सुरु केली. प्रारंभी राखीव भूखंडावरील अतिक्रमित झोपड्या / बांधकामे यांचे वन खात्याने सर्व्हेक्षण करुन यादी केली आणि संबंधित अतिक्रमितांना १९६६ चा कायदा अंतर्गत कलम ५३ व ५४ नुसार नोटिसा दिल्या होत्या. अतिक्रमितांची सुनावणी प्रक्रिया वन खात्याने पूर्ण करुन अतिक्रमणे निष्कासनाची कारवाई करण्याचे निश्चित केले होते. वन खात्याचे विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस बल, महापालिकेच्या पी/उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता (परिरक्षण), सहाय्यक अभियंता (इमारत व कारखाने) यांनी संयुक्तपणे कारवाई करीत एकूण ४५० अतिक्रमित बांधकामे / झोपड्या यांचे निष्कासन केले. या कारवाई दरम्यान पथकांना संबंधित अतिक्रमितांचा तीव्र विरोध, अडथळे, अवमानकारक शेरेबाजी यांचाही सामना करावा लागला. त्याला न जुमानता राखीव भूखंडाभोवती काटेरी तारेचे भूखंडाभोवती तारेचे कुंपण संरक्षक भिंतीसह बांधण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती पालिकेने कळविली आहे.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS