मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षेकरता मध्य रेल्वेवरील कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात उच्च दर्जाचे प्रत्येकी १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. ‘इंटीग्रिटी सिक्युरिटी सिस्टीम’च्या माध्यमातून हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यापूर्वी दादर आणि ठाणे या मध्य रेल्वेवरील या दोन महत्त्वाच्या स्थानकांतदेखील नव्याने १०० सीसीटीव्ही लावण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे रेल्वे पोलीस आयुक्त आलोक बोहरा यांनी दिली.
यापूर्वी मध्य रेल्वेवरील सीएसटी, दादर, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आता मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांतही नव्याने १०० कॅमेरे लावण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील ठाणे, दादर, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या गाडय़ांची मोठया प्रमाणात ये-जा असल्याने या स्थानकांत मोठया प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. नव्याने लावण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे उच्च दर्जाचे असल्याने यात सूक्ष्म वस्तूदेखील स्पष्टपणे निदर्शनास येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात एखादा गुन्हा घडल्यास पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. यापूर्वी वांद्रे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत गुन्हेगार कैद झाल्याने पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचणे अधिक सोपे झाले होते.

