मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील संत रोहिदास मार्गावरील धारावी उदंचन केंद्राच्या परिसरात असणा-या ‘ओल्या कच-यापासून खतनिर्मिती व सुका कचरा वर्गीकरण केंद्र’चे उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्त (परिमंडळ २) आनंद वाघराळकर, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता, उपायुक्त आनंद वाघराळकर, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्यासह मान्यवरांनी कचरा वर्गीकरण व खतनिर्मिती केंद्राची पाहणी करुन तेथील कार्याची सविस्तर माहिती घेतली. उद्घाटन करण्यात आलेल्या खतनिर्मिती व कचरा वर्गीकरण केंद्रामध्ये ओल्या कच-यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करणे, त्याचबरोबर सुक्या कच-याचे वर्गीकरण करणे शक्य होणार आहे. खतनिर्मिती व कचरा वर्गीकरण या बाबत असणा-या तांत्रिक गरजा लक्षात घेऊन महापालिकेच्या अभियंत्यांनी विशेषरित्या डिझाइन केलेली दोन वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहेत. याचसोबत ओल्या कच-यापासून खतनिमिर्तीसाठी एक अत्याधुनिक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सध्या या खतनिर्मिती केंद्राची ओल्या कच-यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्याची दैनिक क्षमता १० मेट्रिक टन इतकी असून सुका कचरा वर्गीकरण करण्याची दैनिक क्षमता ५ मेट्रिक टन इतकी आहे. उद्घाटन कार्यक्रमादरम्यान संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेद्वारे स्वच्छता व कचरा वर्गीकरण या विषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

