आठवडाभर मरे प्रवाशांचे हाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठवडाभर मरे प्रवाशांचे हाल

Share This
मुंबईच्या लाइफलाइनचे लाइफ अधिक जलद करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकलचे डीसीमधून एसीमध्ये परिवर्तनाचे काम हाती घेतले आहे. पुढील आठवडाभर चाकरमान्यांना हाल सहन करावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

लोकलचा विद्युतप्रवाह डीसीमधून (डायरेक्ट करंट) एसीमध्ये परावर्तित करण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. हा वीजप्रवाह १५00 व्होल्टेज डीसीमधून २५ हजार व्होल्टेजमध्ये परावर्तीत करण्यात आला आहे. यासाठी रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र सोमवारी सकाळी सहानंतरही लोकल गाड्या नियोजित वेळेच्या तब्बल २५-३0 मिनिटे उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांसाठी हे परिवर्तन मोठे तापदायक ठरले आहे. शुक्रवारपासूनच लोकलच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका प्रवाशांना बसत आहे. पुढील आठवडाभर लोकल नियोजित वेळेच्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावणार असल्याची शक्यता मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी वर्तवली आहे. 

मेनलाइनचे परिवर्तनाचे काम पूर्ण झाले असून हार्बर लाइनचे काम अद्याप बाकी असल्याची माहितीही सिंग यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांना आठवडाभर मेगा हाल सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.या बदलामुळे लोकलचा वेग वाढणार असून विजेची बचत होण्याची शक्यता वर्तवली जात असून लोकल गाड्यांचा वेग १00 किमीपर्यंत वाढवला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरून जाणार्‍या लांब पल्ल्याच्या १७ हून अधिक गाड्यांच्या वेळेतही बचत होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेच्या हद्दीतील इगतपुरी येथे डीसी असल्याने इंजिनात बदल करून पुढील प्रवास करावा लागतो. यामुळे बराच वेळ वाया जातो. मात्र एसी परिवर्तनामुळे हा वेळ वाचणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages