दलित विद्यार्थ्यांच्या संघटनेविरोधातील कारवाई घटना विरोधी- उत्तम खोब्रागडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2015

दलित विद्यार्थ्यांच्या संघटनेविरोधातील कारवाई घटना विरोधी- उत्तम खोब्रागडे

मुंबई, दिनांक १ जून
केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर चेन्नई आयआयटी मधील  आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल या दलित विद्यार्थ्यांच्या  गटावर बंदी घालणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे, भारतासारख्या लोकशाही देशात असे प्रकार कदापीही सहन केले जाणार नाहीत, या विद्यार्थ्यांवरील बंदी त्वरित उठवावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  



केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात मतप्रदर्शन केल्याने चेन्नई आयआयटीमधील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल या दलित विद्यार्थ्यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानंतर चेन्नई आयआयटीच्या प्राचार्यांनी या गटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. देशभरातून या विरोधात आवाज उठवला जात आहे. खोब्रागडे यावेळी म्हणाले, केवळ  केंद्र सरकारवर व त्यांच्या धोरणांवर टीका केल्याने बंदी घालणे ही अत्यंत चुकीची बाब आहे.  देशाच्या संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे, मात्र केवळ केंद्र सरकारवर टीका केल्याने बंदी घालणे हे राज्य घटनेतील मुलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. असे प्रकार वेळीच रोखण्याची गरज आहे, अन्यथा आगामी काळात सरकारविरोधी बोलणाऱ्यांवर अशीच कारवाई होण्याची भीती नाकारता येणार नाही. विद्यापीठे, आयआयटी अशी ठिकाणे विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याचे एक व्यासपीठ असते, त्यामुळे अशी कारवाई रोखण्याची आवश्यकता आहे.दलित विद्यार्थ्यांच्या संघटनेवर अशा प्रकारे बंदी घालणे हे घटना विरोधी आहे, सरकारने असे प्रकार त्वरित रोखावेत व यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. याविरोधात पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा खोब्रागडे यांनी यावेळी दिला. भारतासारख्या लोकशाही देशात असे प्रकार घडू लागले तर लोकशाही धोक्यात येण्याचा इशारा त्यांनी दिला.


JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS