पेव्हरब्लॉकमुळे मुंबईकर त्रस्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पेव्हरब्लॉकमुळे मुंबईकर त्रस्त

Share This
मुंबई महानगर पालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यामधील साटेलोटयाबाबत वृत्तपत्रात अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात. अश्याच काही प्रकरणांचा अभ्यास करून आम्ही हे साटेलोटे सातत्याने उघड करत आलो आहोत. अशी कित्तेक प्रकरणे बाहेर येत असताना कंत्राटदाराकडून मिळणारी टक्केवारी बंद होईल या भीतीने वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकारी आणि कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पालिकेचे अधिकारी प्रशासन बचाव करत असताना वेळोवेळी कोणते ना कोणते प्रकरण बाहेर आल्याने पालिकेच्या इज्जतीचे मात्र धिंडवडे निघत असतात. 

मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी मुसळधार पाऊस पडला मुंबई तुंबली आणि नाले सफाई चांगली झाली मुंबई तुंबणार नाही असा केलेला दावा फोल ठरला आहे. हा दावा फोल ठरला असतानाच काँग्रेसच्या नगरसेवक मोहसीन हैदर आणि चंगेज मुलतानी या दोन नगरसेवकांनी नाले सफाईची भांडा फोड करत कंत्राटदारांनी नालेसफाईचा गाळ टाकण्यासाठी पालिकेला दिलेली ना हरकत पत्रे बोगस असल्याचे सिद्ध केले आहे. कंत्राटदारांना गाळ टाकण्यासाठी जागाच मिळाली नसल्याने मुंबई मधील नाल्यांमधील गाळ काढलाच नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत बोंबाबोंब झाल्यावर आयुक्त अजोय मेहता यांना चौकशी नेमावी लागली आहे. 
नाले सफाईची अशी अवस्था असताना मुंबईमधील रस्त्यांची अवस्थाही वाईट झाली आहे. गेले काही वर्षे पावसाळा सुरु झाला कि रस्तावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित होतो. रस्ते बांधताना कंत्राटदारांकडून रस्ता किती वर्षे टिकेल याची हमी घेतली जाते. अशी हमी घेवूनही मुंबई मधील रसत्यांवर पावसाळ्यात खड्डे पडलेले पाहायला मिळत असतात. नालेसफाई  खड्ड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो. परंतू मुंबईमधील रस्त्यांच्या मुळे मुंबई शहराचे नाव खराब होत आले आहे. रस्त्यावरील खड्डयाप्रमाणेच पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांचा आणि फुटपाथकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. 
नुकताच शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील गणेश गावडे रोड जंक्शन येथे शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रस्ता खचून वाळू घेऊन जाणारा ट्रक अडकून पडला. या ट्रकच्या मागील चाकाचा अर्धा भाग यामध्ये अडकला गेला आणि ट्रकचा पुढील भाग वर उचलला गेला. हा ट्रक कलंडला गेला नाही अन्यथा या ट्रकमधील सर्व वाळू रस्त्यावर आणि आजूबाजूच्या दुकानांवर फेकली गेली असती. हा ट्रक अडकल्यानंतर रात्री साडेसातनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. मुलुंड पश्चिम येथील गावडे मार्ग या वर्दळीच्या रस्त्यावर ट्रक अडकल्याने या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे दोनच वर्षापूर्वी हा रस्ता पेव्हर ब्लॉकने बनवला गेला होता. या जंक्शनला सुधार समिती अध्यक्ष आणि भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयासमोरीलच रस्ता खचल्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे तसेच रस्ता बनवताना कंत्राटदाराने योग्य काळजी घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. असेच मुंबई मध्ये कित्तेक रस्ते खचले आहेत. कित्तेक फुटपाथ असमतोल झाले आहेत. काही ठिकाणी तर पेव्हरब्लॉकच्या  रस्त्यावर किंवा फुटपाथवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. 
मुंबईमध्ये कमीत कमी कालावधीमध्ये रस्ते बनवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. परंतु मुंबई मधील रस्त्यांना अवजड वाहनांचा भार सोसेनासा झाला आहे. रस्त्यांप्रमाणेच मुंबईमधील फुटपाथ वरील पेव्हर ब्लॉक जागेवर नसतात. यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. या होणाऱ्या त्रासाकडे पालिका आणि पालिकेतील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेने मुंबईमधील पेव्हरब्लॉकच्या रस्त्यांची आणि फुटपाथ यांची पाहणी करणे गरजेचे आहे. मुंबई मधील बहुतेक सर्वच फुटपाथवरील पेव्हरब्लॉक जागेवर नसल्याचे समोर येईल. फुटपाथवरील पेव्हर ब्लॉकमुळे नागरिकांचे चालणेही मुश्किल झाले आहे. 
मुंबईमधील रस्त्यावर आणि फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक जागेवर नसल्याने, पेव्हर ब्लॉक असमतोल झाल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयामध्येही पाणी जमा होत आहे मुंबईकर नागरिकांना रस्त्यावरील खड्डयाप्रमाणेच पेव्हरब्लॉक असलेल्या रस्त्यावर आणि फुटपाथवर त्रास सहन करावा लागा असल्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे. पेव्हर ब्लॉक लावलेल्या फुटपाथ आणि रस्त्यांचा अहवाल मागवून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करायला हवी. 
मुंबईकर नागरिकांना फुटपाथवरून चालण्याचा हक्क आहे.  हा हक्क पालिकेच्या अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे हिरावला जात आहे. पेव्हरब्लॉक बसवण्यात मोठा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार आयुक्तांनी खणून काढला पाहिजे. कंत्राटदार पालिकेला थुकपट्टी लावून आपली बिले मंजूर करून घेत असले तरी कंत्राटदराने बनवलेले रस्ते आणि फुटपाथ योग्य आहेत का याची शहनिशा सुद्धा करण्याची गरज आहे. मुंबईकर नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. 
अजेयकुमार जाधव (मो. ९९६९१९१३६३)
paver block

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages