अतिवेगवान लोकलसाठी 'गतिरोधक' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अतिवेगवान लोकलसाठी 'गतिरोधक'

Share This
मुंबई : प्रत्येक टर्मिनसवर आणि लोकल सुटण्याच्या पहिल्या स्थानकात (ओरिजनेटिंग स्टेशन) परतणार्‍या लोकलचा वेग ४0 किमी.पेक्षा जास्त असल्यास त्यांचा वेग कमी करणारी आणि आपोआप ब्रेक लागण्यासाठी 'गतिरोधक' बसवण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक टर्मिनस स्थानकात 'ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टिम' (एडब्ल्यूएस) बसवली जाणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. ही यंत्रणा गेल्या कित्येक वर्षांपासून पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमध्ये कार्यरत आहे. ती आता टर्मिनसजवळ लावण्यात येणार आहे. 

चर्चगेट स्थानकात झालेल्या अपघातांची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, यासाठी रेल्वेने ठोस पावले उचलली असून एखादी लोकल ठरलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने टर्मिनसमध्ये शिरल्यास तिचा वेग कमी करणारी ही 'एडब्ल्यूएस'यंत्रणा बसवण्यात येणार आहे. लोकलच्या मोटरमनच्या कॅबमध्ये ही प्रणाली बसवलेली आहे. त्यामुळे मोटरमनला सिग्नलविषयीची अद्ययावत माहिती मिळते. लाल सिग्नल असल्यास लोकलचा वेग तात्काळ प्रतितास १५ किमी. करावा लागतो, पिवळा सिग्नल असेल तर हा वेग ताशी ३८ किमी. आणि हिरवा व दोन पिवळे सिग्नल असल्यास लोकलचा वेग प्रतितास ७0 किमी. करावा लागतो. जर मोटरमनने या वेगापेक्षा जास्त वेगाने लोकल चालवल्यास मोटरमन कॅबमधील धोक्याची घंटा वाजते. त्याकडे दुर्लक्ष करून मोटरमनने चार सेकंदांत गाडी थांबवली नाही तर लोकलचे ब्रेक आपोआप लागून गाडी थांबते. चर्चगेटच्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लवकरच टर्मिनसजवळ ही प्रणाली लावण्यात येणार आहे, असे सूद म्हणाले.

रविवारच्या घटनेतील मोटरमन एल. सी. तिवारी मोबाइलवर संभाषण करत नव्हते. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी मोबाइलचा वापर केला नव्हता, असे आढळले आहे. शिवाय त्यांच्या लोकलमधील 'ईपी ब्रेक ' आणि 'ऑटो ब्रेक-एअर ब्रेक' यंत्रणा मरिन लाइन्स स्थानकापर्यंत १00 टक्के कार्यरत होती, असेही गाडीच्या तांत्रिक तपासणीत निदर्शनास आले आहे, अशी माहिती सुनीलकुमार सूद यांनी दिली. तर लोकलचा वेग कमी करण्यासाठी मी नेहमीप्रमाणे 'ईपी' ब्रेक दाबले; पण गाडी थांबली नाही. 'परत मी ब्रेक लावूनही लोकल न थांबल्याने मी घाबरलो. माझे लोकलवरील नियंत्रण सुटले,' असा खुलासा एल. सी. तिवारी यांनी रेल्वे प्रशासनाकडे दिला आहे, अशी माहिती विश्‍वसनीय गोटातून मिळाली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages