मुंबई ( प्रतिनिधी ) - : पावसात झपाट्याने पसरणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा यंदा सज्ज आहे, असे सांगण्यात येत असले तरी अद्याप रुग्णालयांतील असुविधा कायम आहेत. सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बोरीवलीतील शताब्दी रुग्णालयात सीटीस्कॅनची सुविधा नसल्याने येथील रुग्णांचे हाल सुरू आहेत. मालवणी येथील दारूकांडातील रुग्णांसाठी येथील असुविधांचा फटका बसला असा आरोप काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका अजंता यादव यांनी केला आहे. आज होणाऱ्या पालिका सभागृहात सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात काॅगेस हल्लाबोल करणार आहे.
दोन वर्षांपूर्वी शताब्दी रुग्णालय सुरु करण्यात आले त्यावेळी भगवती रुग्णालयातील काही यंत्रणा या रुग्णालयात आणण्यात आल्या. पण यावेळी आवश्यक असणारे सीटी स्कॅनचे मशीन पालिकेने उपलब्ध केले नाही. सीटी स्कॅन मशीन आणण्याच्या कामांमध्ये शिवसेना व भाजपने भ्रष्ट्राचार केला असल्याचा थेट आरोप यादव यांनी केला आहे. चांगल्या स्थितीत असलेले सीटी स्कॅन मशीन शताब्दी रुग्णालयात आणण्याऐवजी ते मशीन बंद पडलेल्या भगवती रुग्णालयात विनाकारण का ठेवण्यात आले आहे, असा सवालही त्यांनी विचारला आहे. यावर काँग्रेसतर्फे नुकतेच आंदोलनही करण्यात आले. महापालिकेचे हे मोठे रुग्णालय असतानाही अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांसाठी चौवीस तास तज्ज्ञ डॉ उपस्थित नसतात, त्यामुळे रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते. तीनशे चोवीस खाटांचे असलेल्या या रुग्णालयात केवळ एका रुग्णवाहिकेवर डोलारा आहे. मालवणी मध्ये दारुकांडातील रुग्णांना घराकडून रुग्णालयात आणण्यासाठी व दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नसल्याने उपचार सुरु होण्यास विलंब झाला. शिवाय या रुग्णालयात डायलेसिस केंद्र असताना ते केंद्र नेमिनाथ संस्थेला चालवायला दिले आहे. मात्र मालवणी दारुकांडातील रुग्णांना डायलेसिस उपचार करण्यास या संस्थेने नकार दिला असाही आरोप यादव यांनी केला. या संस्थेकडे दिलेले हे केंद्र काढून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. रुग्णालयातील असुविधांकडे मागील दोन वर्षापासून दुर्लक्ष आहे. त्यावर आवाज उठवूनही पालिका प्रशासनने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत या प्रश्नावर दाद मागण्यात येईल, असे यादव यांनी सांगितले.

