वाहतूक नियमावली उल्लंघन - पूर्व विभागात सर्वाधिक गुन्हे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2015

वाहतूक नियमावली उल्लंघन - पूर्व विभागात सर्वाधिक गुन्हे

मुंबई : जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत शहरात रस्ते वाहतूक नियमावली उल्लंघनाच्या एकूण ७.५९ लाख गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी जवळपास २९ टक्के गुन्हे माहिम ते मुलुंड परिसरात घडले. या पूर्व विभागातील रस्ते वाहतुकीला शिस्त आणण्याचे वाहतूक पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे. दुसरीकडे, वरळी ते नागपाडा या मध्य विभागात सर्वात कमी म्हणजेच ११ टक्के गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे.

उपनगरांत वाहनांची संख्या दिवसागणिक वाढतीच असून नवे वाहनचालक नियमावलीचे काटेकोर पालन करत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पोलीस स्थानकांच्या हद्दीचा विचार केल्यास वाहतूक नियमावली उल्लंघनाच्या गुन्ह्यांमध्ये वांद्रे पहिल्या स्थानावर आहे. वांद्रेत ५२,२६३ गुन्हे, तर त्यापाठोपाठ अंधेरी-पश्‍चिमेकडील डी.एन. नगरमध्ये ५१,४६४ गुन्हे नोंद झाले. चालू वर्षाच्या सुरुवातीच्या चार महिन्यांत नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांकडून एकूण ८.0७ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. उपनगरात अधिक गुन्ह्यांची नोंद होण्यास वारंवार केली जाणारी नाकाबंदी हेदेखील एक प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी सुरुवातीच्या चार महिन्यांत शहरात ७.२४ लाख गुन्ह्यांची नोंद झाली होती. यंदा ते प्रमाण वाढल्याने वाहतूक पोलिसांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी आता माहिम, माटुंगा, ट्रॉम्बे, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड परिसरात विशेष लक्ष केंद्रित करून या ठिकाणी वाढलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्याचा निर्धार केला आहे.

      गुन्हे                 दंड
दक्षिण विभाग १.११ लाख    १.१५ कोटी
पश्‍चिम विभाग २.0८ लाख   १.९७ कोटी
मध्य विभाग ८४,४४२       ९७.0६ लाख
उत्तर विभाग १.३५ लाख    १.६0 कोटी
पूर्व विभाग २.२१ लाख      २.३८ कोटी

Post Bottom Ad

JPN NEWS