बेस्टमध्ये भरती, पदोन्नती बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 June 2015

बेस्टमध्ये भरती, पदोन्नती बंद


मुंबई - मुंबई शहराचा वीज पुरवठा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था संभाळणा-या बीईएसटीने यापुढे कुठल्याही खात्यात नवी भरती न करण्याचे तसेच कर्मचा-यांना अंतर्गत पदोन्नती न देण्याचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामुळे कर्मचा-यांमध्ये व्यवस्थापना विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. उपक्रमाची ढासळती आर्थिक स्थिती तसेच आस्थापनेच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विभाग आणि शाखांना नवी भरती न करण्याचे तसेच अंतर्गत पदोन्नती न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाव्यवस्थापकांच्या कार्यालयाकडून जारी झालेल्या परिपत्रकामध्ये हे निर्देश देण्यात आले आहेत. मागच्या आठवडयात बेस्ट समितीच्या बैठकीत या परिपत्रकावर वादळी चर्चा झाली. काही सदस्यांनी या परिपत्रकावर आक्षेप घेत हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली. अनेक वर्षाच्या सेवेनंतर पदोन्नती नाकारण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णया विरोधात बेस्ट कर्मचारी आंदोलनांचे पाऊल उचलू शकतात. येत्या ३१ जुलैपर्यंत बेस्ट प्रशासन उपलब्ध कर्मचारी संख्येचा आढावा घेऊन त्यानुसार पुढील निर्णय घेईल असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या महिन्यात २०० चालक आणि वाहक निवृत्त होणार असून, इतक्याच संख्येने वाहक आणि चालक पुढच्या महिन्याच निवृत्त होणार आहेत. नवीन भरती झाली नाही तर, बेस्टच्या २६ डेपोमधील सेवेवर त्याचा परिणाम दिसून येईल असे एका सदस्याने सांगितले. बेस्ट उपक्रम सध्या अत्यंत वाईट आर्थिक स्थितीतून जात आहे. प्रवासी गमावण्यासह बेस्टचा तोटा २५०० कोटीपेक्षा अधिक आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS