'कॅनेडियन' वेळापत्रकाची सक्ती केल्यास १ ऑगस्टपासून आंदोलन - बेस्ट वर्कर्स युनियन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'कॅनेडियन' वेळापत्रकाची सक्ती केल्यास १ ऑगस्टपासून आंदोलन - बेस्ट वर्कर्स युनियन

Share This
मुंबई : बेस्ट उपक्रमातील बस वाहक आणि चालकांना याआधीही त्रासदायक ठरलेल्या 'कॅनेडियन' वेळापत्रकाची सक्ती शनिवारीही केल्यास कोणत्याही क्षणी बस सेवा बंद करण्यात येईल आणि हे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय त्वरीत मागे न घेतल्यास १ ऑगस्टला बेस्टचे वाहक आणि चालक आंदोलन करतील, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे उदय आंबोणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

१ एप्रिल २0१४ पूर्वी वाहक आणि चालकांच्या चौमाही कामासंदर्भात ड्युटी बनवण्यासाठी पारंपरिक पद्धत वापरण्यात येत होती. मात्र यात बदल करण्याच्या दृष्टीने बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीच्या मदतीने एका कॅनेडियन कंपनीला कंत्राट देऊन सर्व 'ड्युटी'चे नियोजन हाताने न करता, संगणकाच्या सहाय्याने केले. पारंपरिक पद्धतीत वाहक आणि चालकांच्या 'ड्युटी' या दोन्ही पाळ्यांमध्ये एकाच मार्गावर आणि आठ ते दहा तासांच्या 'स्प्रेड ओव्हर' वेळेतही असायच्या पण प्रत्यक्षात त्या सहा ते साडे सात तास अवधींच्या होत्या. प्रत्येक ड्युटीमध्ये विश्रांतीची वेळ एकदाच असे आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार १२ तासांच्या 'स्प्रेड ओव्हर'मध्ये जास्तीतजास्त तीन ते चार टक्के ड्युटी होत्या, पण 'कॅनेडियन' सॉफ्टवेअरच्या वापरामुळे ९९ टक्के ड्युट्यांमध्ये पहिली पाळी वेगळ्या बसमार्गावर व दुसरी पाळी दुसर्‍या मार्गावर अशा 'ड्युटी' तयार केल्या होत्या. त्याला युनियनने विरोध केल्यानंतर उपक्रमाचे उपमहाव्यवस्थापक (वाहतूक प्रवर्तन) आर. आर. देशपांडे यांनी कामगारांना त्रासदायक वाटणार नाहीत, अशा ड्युट्या बनवण्याची ग्वाही दिली. पण शुक्रवारपासून बेस्ट प्रशासनाने सकाळीच 'कॅनेडियन' पद्धतीने वेळापत्रक लागू केल्यामुळे बस वाहक -चालकांनी ड्युटी वाटपावर बहिष्कार घातला. शुक्रवारी सकाळी ३ वाजल्यापासून ड्युटी वाटप सुरू झाले असून, दुपारी दीड वाजेपर्यंत फक्त दोन-तीन टक्के कामगारांनी ड्युटीचे अर्ज भरले होते. पण शिवसेनेचे बेस्ट समितीचे सदस्य आणि बेस्ट कामगार सेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी आगारांत जाऊन, कामगारांना दडपशाहीने या 'ड्युट्या' स्वीकारण्यासाठी भाग पाडत आहेत. पण अशाच पद्धतीने वाहक-चालकांना ड्युटी लावल्यास आणि शनिवारीही त्याची सक्ती केल्यास कोणत्याही क्षणी वाहक-चालक काम बंद करतील, असा इशारा अँड़ आंबोणकर यांनी दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages