मुंबई / प्रतिनिधी
दररोज शेकडो वाहनांच्या गर्दीतून बेस्टच्या बसला मोकळा रस्ता मिळण्यासाठी 'डेडिकेटेड लेन'ची योजना हाती घेण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आगामी काळात ही योजना लवकरच मार्गी लागेल. पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), सुमननगर, हाजी अली, वरळी मार्गांवर बेस्टच्या बससाठी 'डेडिकेटेड लेन' ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात बेस्टच्या बससाठी 'डेडिकेटेड लेन' ठेवण्यासंबंधी राज्याचे मुख्य सचिव व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील 'कोअर कमिटी' व वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त यांची संयुक्त बैठक बुधवारी झाली. दरवर्षी ७ ऑगस्टला 'बेस्ट दिन' असतो. या वेळी 'बेस्ट बझ' अंतर्गत सेलिब्रिटी, एनजीओंना निमंत्रित करण्यात येणार आहे. 'गिव्ह वे टू बस' अशी संकल्पनादेखील राबवण्याचा विचार आहे, असे सांगून महाव्यवस्थापक म्हणाले, 'बेस्टच्या ताफ्यातील एसी आणि नॉन एसी बसेसचे पास सीप्झमधील डायमंड मार्केटमधील तब्बल ६0 हजार व्यावसायिक-उद्योजकांना २00 बसगाड्या देण्याची प्रक्रिया सुरू असून, मुंबई पोर्ट ट्रस्टमधील ४५0 कर्मचार्यांसाठी खास बसेस चालवण्यात येत आहेत. त्यांनाही बसपास दिले आहेत. बेस्टच्या बसेसमधून प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई विद्यापीठातील प्रमुख आणि एनजीओंच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. लोकांच्या सक्रीय चळवळीशिवाय आणि सकारात्मक प्रतिसादाशिवाय हे शक्य होणार नाही. 'हायर माय बस' संकल्पना बेस्ट उपक्रम जोमाने राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले.

