मुंबई । प्रतिनिधी
महापालिकेच्या 'आर/मध्य' विभागांतर्गत येणाऱया गोराई परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सध्या सुरु असलेल्या विकासकामांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात मतभिन्नता असल्यामुळे विकासकार्यांची गती मंदावू शकते तसेच विकासकार्य करताना स्थानिकांची मते विचारात घेणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन क्रीडांगणावर सुरु असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकार्यांबाबत स्थानिकांसोबत एक संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश बाजार व उद्यान समिती अध्यक्ष अजित भंडारी यांनी दिले.
पाहणी दौऱयादरम्यान बाजार व उद्यान समिती अध्यक्ष अजित भंडारी यांनी गोराई परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उद्यान विभागाच्या संबंधित अधिकाऱयांनी माहिती देताना सांगितले की, क्रीडांगणावर सुरु असलेली विविध विकासकार्ये पूर्ण होत आली असून त्यामध्ये प्रामुख्याने मैदानाच्या मध्यभागी असणारी लहान मुलांसाठीची खेळणी मैदानाच्या एका कोपऱयात हलविण्यात आली आहेत, ज्यामुळे मैदानी खेळ खेळण्यासाठी अधिक प्रशस्त मैदान स्थानिकांना उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे बाक, फेरफटका मारण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, खेळताना मुले पडल्यास त्यांना लागू नये यासाठी लहान मुलांच्या खेळण्यांजवळ जाड रबराच्या चटईचे आच्छादन, अत्याधुनिक पद्धतीचे विद्युत दिवे यासारख्या विविध सेवा-सुविधा देखील क्रीडांगणावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मात्र, उपस्थित स्थानिक नागरिकांनी काही सेवा-सुविधांबाबत त्यांचे आक्षेप अध्यक्ष भंडारी यांचेकडे मांडले. त्यावर बाजार व उद्यान समिती भंडारी यांनी सदर क्रीडांगणावर सुरु असलेल्या विकास कामांबाबत स्थानिकांची मते लक्षात घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करीत सदर बाबतीत संबंधित लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवाशी व अधिकारी यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी, असे निर्देश महापालिकेच्या संबंधित खात्याला दिले.
त्याचबरोबर भंडारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरक्षा रक्षक सदैव असणे गरजेचे असल्याचे नमूद करीत त्याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश महापालिकेच्या उद्यान खात्याला दिले. तसेच उद्यानामध्ये लावण्यात आलेल्या एका शिक्षण संस्थेच्या फलकाची योग्य-अयोग्यता तपासून त्यावर नियमानुसार कारवाई व शुल्क आकारणी करावी, असेही निर्देश भंडारी यांनी आजच्या दौऱया दरम्यान दिले.

