मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील सांताक्रूझ येथील गोळीबार परिसरात आज झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात ४ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना काही स्थानिक लोकांनी मारहाण केल्याने पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गोळीबार नगरातील भोलासिंग चाळीत सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हा स्फोट इतका भयंकर होता की आसपासचा परिसरही हादरून गेला. स्फोटानंतर आग लागल्यानं परिसरात घबराट पसरली. अपघाताचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत आगीत होरपळून कपिल रामबहादूर दिक्षित (वय वर्षे ४०),जितेंद्र राजदेव दिक्षित ( वय वर्षे १७), यशवंत राजदेव दिक्षित ( वय वर्षे १८), राजदेव रामतीर्थी दिक्षित (वय वर्षे ५०) या चौघांचा मृत्यू झाला होता. तर साईकुमार ताजदेव दिक्षित, मिरा उपाध्याय, शोभा राजेंद्र सिंग नेगी या तिघांची प्रकृतीची चिंताजनक आहे. अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून आर्थिक मदत करण्याचे आव्हान मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले
पत्रकारांना मारहाण
या स्फोटाच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींवर काही स्थानिक गुंडांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या घटनेचे वृत्तांकन करणा-या महिला पत्रकारांना उद्देशून बघ्यांपैकी काही जणांनी काही कॉमेंट्स केल्या, त्याबद्दल त्यांना जाब विचारला असता त्यांनी मीडिया प्रतिनिधींवर दगडफेक करत हल्ला केला. तसेच काहींचे कॅमेरे खेचून घेण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकारांना मारहाण करणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ ( रजि.), मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ, जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र इत्यादि पत्रकार संघटनांनी केली आहे.

