मुंबई ( प्रतिनिधी ) - : मुंबईभरात महापालिकेने बांधलेल्या व संस्थांना चालवण्यास दिलेल्या पे अॅण्ड युज शौचालयातील मोफत असलेल्या मुतारीसाठी आता पुरुषांना एक रुपया मोजावा लागणार आहे. तसा प्रस्ताव मुंबई महापालिकेने तयार केला असून लवकरच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. शौचालय चालवणाऱ्या संस्थांच्या या मागणीला पालिका प्रशासनाने तयारी दर्शवली आहे. मात्र एक रुपया घेतल्यास पुरुषांकडून मुतारीचा वापर न करता मोकळ्या जागेचा वापर केला गेल्यास पालिकेची डोकेदुखी बनेल. पण तरीही प्रयोग करायला काय हरकत आहे? असा विचार करून एक रुपयाचा प्रस्ताव आणला गेला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत जवळपास एक हजार शौचालय पालिकेने बांधून ते संस्थांना चालवण्यासाठी दिले आहेत. यात महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे शौचालये उपलब्ध केले आहेत. शौचालय व स्नानासाठी ३ व पाच रुपये आकारले जातात. या पैशातून देखभाल करणे संस्थांना परवडत नाही. मुतारीचा वापर रोज हजारो मुंबईकरांकडून मोफत केला जात असल्याने मुताऱ्या साफ करण्यासाठी असणाऱ्या कामगारांना मानधन द्यावे लागते. हे परवडत नसल्याने मुतारीच्या वापरासाठी स्त्रियांसह पुरुषांकडूनही एक रुपया घेण्याची परवानगी मिळावी अशी मागणी संबंधित संस्थांनी पालिकेकडे केली आहे. महापालिका प्रशासनानेही संस्थांची समस्या लक्षात घेऊन तसा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र या प्रस्तावाला कडाडून विरोध होईलच. पण पुरुषांनी अशा मुताऱ्यांचा वापर न करता उघड्यावर जाणे सुरू केले तर काय करायचे? हा पेच अद्याप पालिकेपुढे आहे. याचा विचार पालिका करत आहे

