राणीबाग जवळील खेळाचे मैदान वाचवणारा आराखडा सादर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राणीबाग जवळील खेळाचे मैदान वाचवणारा आराखडा सादर

Share This

मुंबई / प्रतिनिधी 

भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण करण्याची योजना मुंबई महापालिकेने आखल्यानंतर त्याचा आराखडा तयार करण्यासाठी जगातील वास्तुविशारदांनी आपल्या वेगवेगळ्या डिझाईन सादर केल्या आहेत. या डिझाईनमध्ये संग्रहालयाजवळील खेळाचे मैदान कुठेही दिसत नसताना हे खेळाचे मैदान वाचेल असे डिझाईन सातार्‍याजवळील बावकलवाडीतील गणेश दादा केसकर या अवघ्या २२ वर्षीय युवकानेही तयार केले आहे.या युवकाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत केले. संग्रहालयाजवळील मोठे मैदान वाचवण्याच्या स्थानिकांच्या मागणीचा विचार या डिझाईन मध्ये असल्याने पालिकेतील सत्ताधारी या डिझाईनला मंजुरी देवून खेळाचे मैदान वाचवतील का असा प्रश्न विचारला जात आहे. 

बजाज फाऊंडेशनकडे या संग्रहालयाचे व्यवस्थापन होते; पण महापालिकेच्या महासभेने हे व्यवस्थापन काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या संग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी जागतिक दर्जावरील वास्तुविशारदांची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये आठ वास्तुविशारदांनी सहभाग घेतला. त्यांच्यापैकी अमेरिकेतील वास्तुविशारदाचा आराखडा पसंतीस पडला; पण त्यांच्या आराखड्यात संग्रहालयाजवळील मैदान कसे वाचवता येईल, याचे काहीच आरेखन केले नसल्याने त्याला पालिकेतील गटनेत्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. याबाबतचे वृत्त नाशिकच्या विद्यावर्धन इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन एन्व्हॉयर्नमेंट अँड आर्किटेक्ट (आयडिआ) या वास्तुविशारद शिक्षण संस्थेतील गणेश केसकरच्या वाचनात आल्यानंतर त्यानेही या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि सलग सहा महिने अहोरात्र मेहनत घेत चांगला वास्तुआराखडा तयार केला आहे. हा आराखडा तयार करणे अत्यंत आव्हानात्मक काम होते. सहकार्‍यांच्या मदतीने मनाजोगा आराखडा तयार झाल्यानंतर त्याने पालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि मनसेचे भायखळ्यातील नेते संजय नाईक यांच्याशी संपर्क साधून आपला मनोदय व्यक्त केला. देशपांडे यांनी बुधवारी केसकर याला पालिका मुख्यालयात पाचारण करून त्याच्या आराखड्याचे प्रसारमाध्यमे आणि गटनेत्यांच्या बैठकीत सादरीकरण केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages