मुंबई पोर्ट ट्रस्टचा रुग्णसेवेसाठी पुढाकार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पोर्ट ट्रस्टचा रुग्णसेवेसाठी पुढाकार

Share This
९५0 खाटांचे हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणार  
मुंबई : मुंबई शहरात वैद्यकीय सेवेचा अपुरेपणा जाणवत असताना आता मुंबई पोर्ट ट्रस्टने रुग्णसेवेसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार अखत्यारित मुंबई पोर्ट ट्रस्टने वडाळ्यातील आपल्या मालकीच्या जागेवर ९५0 खाटांचे हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १ हजार कोटींच्या हॉस्पिटलचा प्रकल्प अहवाल तयार असून, त्याला शिपिंग मंत्रालयाकडून अंतिम मजुरी मिळणे बाकी आहे. वेलावर मंजुरी मिळाल्यास पुढील दोन वर्षांत नागरिकांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सेवेचा लाभ घेता येणार आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टची वडाळ्यात मोठय़ा प्रमाणावर जागा आहे. त्यापैकी ११.५ एकर जागा प्रस्तावित हॉस्पिटलसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ट्रस्टचे सध्याचे २६0 खाटांचे हॉस्पिटल खूप जुने असून, ते टप्प्याटप्प्याने जमीनदोस्त केले जाणार आहे. त्याच हॉस्पिटलच्या जागेवर नवे ९५0 खाटांचे हॉस्पिटल उभारले जाणार आहे. ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधर वांगे यांनी नवे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल उभारण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नव्या हॉस्पिटलमध्ये पोर्ट ट्रस्टच्या कर्मचार्‍यांबरोबरच सामान्य नागरिकांनाही शुल्कामध्ये सवलत दिली जाणार आहे. अलीकडेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पोर्ट ट्रस्टच्या कर्मचार्‍यांना चांगल्या दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत, असे मत व्यक्त केले होते. त्या वेळी त्यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची गरजही बोलून दाखवली होती. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांत आकारले जाणारे उपचार शुल्क हे खाजगी हॉस्पिटलच्या तुलनेत कमी असते. मुंबई पोर्ट ट्रस्ट केंद्रीय मंत्रालयाकडून परवानगी मिळवल्यानंतर नव्या हॉस्पिटलसाठी निविदा जारी करणार आहे. पूर्व उपनगरात मुलुंडचे फोर्टिस हॉस्पिटल आणि विक्रोळीतील गोदरेज हॉस्पिटल ही केवळ दोन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे सामान्य रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रसंगी सायनच्या पालिका रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. अशा रुग्णांना पोर्ट ट्रस्टच्या नव्या हॉस्पिटलचा मोठा आधार मिळेल, असे बोलले जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages