डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीत आणणार, रामेश्वरम या मूळगावी अखेरचा निरोप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीत आणणार, रामेश्वरम या मूळगावी अखेरचा निरोप

Share This

नवी दिल्ली, दि. २८ - भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी दिल्लीत आणण्यात येणार आहे. सायंकाळी तामिळनाडूतील रामेश्वरम या त्यांच्या मूळगावी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल. 

         सोमवारी सायंकाळी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ८४ वर्षीय कलाम ६.३०च्या दरम्यान अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. 


आज सकाळी कलाम यांचे पार्थिव शिलाँगहून गुवाहाटी येथे आणण्यात आले. तेथे आसामाचे मुख्यमंत्री तरूम गोगोई यांनी पुष्पचक्र अर्पण करून कलाम यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव विशेष विमानाने राजधानी दिल्लीत नेण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह विमानतळावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

कलाम यांच्या निधनानंतर शासनातर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोणतीही सुट्टी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेजेस व सरकारी कार्यालये सुरू राहणार असल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
===================================
धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे डॉ. अब्दुल कलाम सोमवारी रात्री आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेले. राष्ट्रपती पदापासून भारतरत्नच्या सन्मानापर्यंतची सारी लौकिक आभूषणे फिकी ठरविणाऱ्या या साध्या-सात्विक शास्त्रज्ञाने सत्य, निष्ठा आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाचा संस्कार देशातील तीन पिढ्यांवर केला. देशाला बलशाली होण्याची ज्यांनी दिशा दिली, त्या डॉ. कलाम यांनी देशाचे भविष्य असलेल्या आयआयएमच्या विद्यार्थ्यांना शिलाँगमध्ये दिशा देत असतानाच अंतिम श्वास घेतला. त्यांच्या अकाली जाण्याचे सर्वांनाच धक्का बसला. एक विज्ञानपीठ हपरले अशा शब्दात अनेकांनी  भावना व्यक्त केल्या आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.....

मार्गदर्शक महापुरुष
डॉ. कलाम हे जीवन आणि कार्यामुळे देशवासीयांना प्रेरित करणारे महापुरुष होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कानी पडताच माझ्याकडे शब्दच नव्हते. ते एखाद्या महापुरुषाप्रमाणे जीवन जगले. आपल्या कार्याने त्यांनी देशवासीयांना कायम प्रेरित केले. आज संपूर्ण देश त्यांना नमन करीत आहे. त्यांनी वैज्ञानिकाच्या रूपात देशाला नव्या उंचीवर नेले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

जनतेच्या मनात घर करणारे राष्ट्रपती
डॉ. कलाम हे जनतेच्या मनात घर करणारे राष्ट्रपती होते. त्यांच्या स्वभावातील नम्रता, सदाचार यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. लहान मुलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी ते देशातील युवकांना कायम प्रोत्साहन देत. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला.

ते खरे देशभक्त - सोनिया गांधी
डॉ.कलाम हे थोर शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मुत्सदी होते. लाखो युवकांना प्रेरणा देणारे खरे देशभक्त होते. उक्ती आणि कृतीतून त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले. त्यांनी आपल्या व्यवस्थेत दिलेले योगदान असमांतर असेच राहील. त्यांनी देश- विदेशातील लाखो लोकांना प्रेरित केले. आयआयएममध्ये अखेरचे भाषण देतानाही त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले. आज संपूर्ण देश त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशवासीयांसोबत उभी ठाकली आहे, असे त्या म्हणाल्या.

आपले प्रेरणास्थान, भारताचा मिसाईल मॅन, द्रष्टे, माजी राष्ट्रपती माननीय एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या निधनामुळे मोठी हानी झाली आहे. कलाम यांनी आपल्याला मोठी स्वप्न पाहायला शिकविले आणि ती सत्यात येऊ शकतात, यावर विश्वासही ठेवायला लावले. भारताला सुपर पावर बनविण्याच्या मार्गावर त्यांनी आपले नेतृत्व केले. मी या महान भारतीयापुढे झुकतो आणि त्यांना मानवंदना देतो.
-देवेंद्र फडणवीस

देशातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देण्याचे काम माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने तरुणांचा प्रेरणास्रोत हरपला. भारतरत्न कलाम हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात दैवत्वाचा साक्षात्कार होता. त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी, वैचारिक उंची, आणि बुद्धीची चमक विलक्षण होती. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
-सी. विद्यासागर राव

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages