डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ११ हजार १९१ टायर्स नष्ट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ११ हजार १९१ टायर्स नष्ट

Share This
मुंबई : पावसाच्या साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यू, हिवताप यासारख्या रोगांचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती होते, ही बाब लक्षात घेऊन डासांच्या उत्पत्तीला आळा बसून रोगांच्या प्रसारास प्रतिबंध होण्यासाठी डासांची संभाव्य उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबाबत महापालिकेचा कीटक नियंत्रण विभाग प्रभावीपणे कार्य करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग ११,१९१ टायर्स नष्ट करण्यात आले आहेत. तसेच ताडपत्री, थर्माकोल, शहाळी, नारळाच्या करवंट्या अशा प्रकारच्या ४,0२,२५५ टाकाऊ वस्तूदेखील काढण्यात येऊन नष्ट करण्यात आल्या आहेत किंवा क्षेपणभूमीवर पाठविण्यात आल्या आहेत.

'ई' विभागामधील घोडपदेव, माझगाव, चिंचपोकळी (पूर्व), भायखळा (पूर्व), नायर रुग्णालय, मदनपुरा, अंजीरवाडी, जे.जे. रुग्णालय, मस्तान तलाव, कामाठीपुरा या परिसरातून सर्वाधिक १ हजार ९३१ टायर्स जप्त करण्यात आले. 'के/ पश्‍चिम ' विभागातून १,१७४ टायर्स काढण्यात आले आहेत. 'के/पश्‍चिम' विभागामध्ये ओशिवरा, कांदिवली (पूर्व), आदर्श नगर, स्वामी सर्मथ नगर, वर्सोवा, आंबोली हिल, माल्कम बाग, सात बंगला, मनीष नगर, अंधेरी, जुहू, विलेपार्ले (पश्‍चिम) या परिसरांचा समावेश होतो. महापालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाद्वारे चालू असलेल्या मोहिमेअंतर्गत ताडपत्री, थर्माकोल, शहाळी, नारळाच्या करवंटी इत्यादी पाणी साचू शकतील अशा प्रकारच्या इतरही वस्तू काढण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १,00,३0२ इतक्या वस्तू महापालिकेच्या 'जी/ उत्तर' विभाग दादर (पश्‍चिम), माहिम, धारावी, मुकुंद नगर, राजर्षी शाहू नगर, माटुंगा आदी परिसरातून जप्त करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे 'ई' विभागातून ९९,८५५ वस्तू काढून क्षेपणभूमीवर पाठविण्यात येतात

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages