शालेय विद्यार्थ्यांसाठी १२५ रुपयांचा बेस्ट बसपास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शालेय विद्यार्थ्यांसाठी १२५ रुपयांचा बेस्ट बसपास

Share This
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्टच्या नियमित मार्गांवरच बसपास देणे जास्त उचित ठरेल. त्यांना दरमहा या पाससाठी अवघे १२५ रुपये भरावे लागतील, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी गुरुवारी बेस्ट समितीच्या सभेत आणि पत्रकारांना सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना बेस्टचा बसपास देण्याच्या प्रस्तावावरून बेस्ट समितीच्या सभेत राजकारण होऊन त्यावर उपसूचनाही मांडण्यात आल्या. काँग्रेसच्या सदस्यांनी उपसूचना मांडल्यानंतर त्यावर मनसेने आणि नंतर सत्तारुढ शिवसेनेच्या सदस्यांनीही उपसूचना मांडली. अखेर महाव्यवस्थापकांनी याविषयी उत्तर दिल्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी उपसूचना मागे घेतली.


बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती अतिशय अडचणीची असताना सामाजिक बांधीलकीची जाण ठेवून उपक्रमाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना सवलतीचे बसपास देण्याचा वाहतूक विभागाचा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी मांडण्यात आला. सहा महिन्यांच्या नियमित बससेवेसाठी एक हजार रुपयांचा आणि मासिक पाससाठी १६७ रुपयांचा पास देण्यात येणार आहे आणि विशेष बसफेर्‍यांवर १0 किलोमीटर अंतरासाठी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ३00 रुपये आणि खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना ४00 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या तुलनेत खाजगी बसगाड्यांचे कमीतकमी मासिक शुल्क ५५0 रुपये आहे, तर १0 किलोमीटर अंतरापर्यंत असणार्‍या पालिका शाळांसाठी सध्याच्या बसपासचे मूल्य १८00 रुपये असून प्रस्तावित १५00 रुपये आहे, तर १0 किमीपेक्षा जास्त अंतर असलेल्या शाळांसाठी विद्यमान मूल्य किमान २५00 रुपये आणि खाजगी शाळा महापालिका हद्दीबाहेर १0 किमीपेक्षा जास्त अंतरावर असतील तर या पासचे मूल्य पाच हजार रुपये आहे.

शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनी पाठिंबा देताना बेस्ट आर्थिक अडचणीत असल्यामुळे पालिकेकडून ३00 कोटी रुपये मागितले होते; पण ते वेळेत न मिळाल्याने बसपासच्या दरवाढीचा प्रस्ताव फेब्रुवारीपासून प्रलंबित होता, असे त्यांनी सांगितले. सभा संपल्यानंतर महाव्यवस्थापकांनी बसपाससंदर्भात पत्रकारांना सांगितले, 'डेडिकेटेड मार्गांवर आणि नियमित मार्गांवर देण्यात येणार्‍या पासचे मूल्य वेगवेगळे आहे. तब्बल ३५0 'डेडिकेटेड' मार्गांंवर गर्दीच्या वेळेत रोज धावणार्‍या २५0 बसेस आहेत; पण या बसगाड्या सुट्टीच्या आणि रविवारच्या दिवशी बंद असतात. या दिवशी फक्त ६0 ते ७0 टक्के बस रस्त्यांवर धावतात. विद्यार्थ्यांसाठी नियमित मार्गिका ठरवण्यात येतील आणि या बससेवा कमी पडल्यास त्यांची संख्याही वाढवण्यात येईल. या मार्गांंवरील बसपासचे मूल्य दरमहा फक्त १२५ रुपये आकारण्यात येईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages