मधुमेहाबाबत शॉर्ट अँनिमेटेड फिल्म मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित केली जाणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मधुमेहाबाबत शॉर्ट अँनिमेटेड फिल्म मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित केली जाणार

Share This
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. यांनी मधुमेह आणि वाढीस लागलेला लठ्ठपणा या समस्या ठळक करण्याकरिता संयुक्तपणे एक शॉर्ट अँनिमेटेड फिल्म दाखल केली आहे. शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून दाखल करण्यात आलेली ही माहितीपर फिल्म मुंबईतील १00 हून अधिक मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.

एमसीजीएमच्या पश्‍चिम उपनगरी भागाचे अतिरिक्त आयुक्त संजय एस. देशमुख, केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ. अविनाश सुपे, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.चे अध्यक्ष सुजेश वासुदेवन, एमसीजीएमच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही फिल्म दाखल करण्यात आली. एमसीजीएमच्या 'स्वास्थ्य में है स्वाद' या मोहिमेचा एक भाग म्हणून दाखल करण्यात आलेली ही फिल्म मधुमेहाला चार हात लांब ठेवण्याकरिता आरोग्यदायी खाणे आणि व्यायाम करणे या दोन गोष्टींवर भाष्य करणारी आहे. ही माहितीपर अँनिमेटेड फिल्म चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. सध्या बाहुबली आणि बजरंगी भाईजान हे चित्रपट पाहण्याकरिता प्रेक्षक मोठय़ा संख्येने चित्रपटगृहांमध्ये येत असल्याने ही फिल्म यादरम्यान दाखवली जाणार आहे. या शॉर्ट अँनिमेशन फिल्ममध्ये दोन लहान मुलांच्या वेगवेगळ्या जीवनशैली दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील एक मूल योग्य आहार घेणे, व्यायाम करणे, मैदानी खेळ खेळणे अशी आरोग्यदायी जीवनशैली अनुसरते, तर दुसरे मूल जंक फूड खाणे, आळशासारखे बसून राहणे, टीव्ही पाहणे, नाहीतर झोपणे अशी आरोग्यास अपायकारक असलेली जीवनशैली अवलंबते. या फिल्मच्या माध्यमातून पालक आणि मुलांमध्ये आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अंगिकार करण्याचे महत्त्व बिंबवण्याचा आणि त्यातून लठ्ठपणा व मधुमेह अशा समस्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages