मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोटाची मालिका घडवून २५७ निष्पाप नागरीकांचे बळी घेणा-या याकूब मेमनला अखेर गुरुवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकवण्यात आले. सकाळी ६.२० मिनिटांनी याकूबला फाशी देण्यात आली. ७.०१ मिनिटांनी तुरुंगातील डॉक्टरांनी याकूबला मृत घोषित केले. तुरुंगातच याकूबच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याकूबच्या संपूर्ण फाशीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले.
याकूबच्या फाशीच्यावेळी सहा ते सात अधिकारी तेथे उपस्थित होते. फासावर जाण्यापूर्वी याकूबने नमाज पठण केले. फाशी दिल्यानंतर याकूबचा मृतदेह त्याच्या दोन भावांना दाखवून कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. याकूबचा मृतदेह घेऊन कुटुंबिय विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. माहिम किंवा मरीन ड्राइव्ह येथील बडा कब्रस्तान भागात याकूबच्या मृतदेहाचे दफन होऊ शकते.
याकूबला फाशी होऊ नये यासाठी रात्रभर त्याच्या वकिलांनी धडपड केली. बुधवारी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाने याकूबची सुधार याचिका फेटाळून लावली त्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपालांनीही याकूबचा दयेजा अर्ज फेटाळून लावल्याने याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले होते. याकूबच्या मृतदेहाचा ताबा कुटुंबियांना मिळावा यासाठी सुलेमानने तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला आहे. मुंबईला हादरवून सोडणा-या १३ साखळी बॉम्बस्फोटात याकूबचा सहभाग सिध्द झाल्याने टाडा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. या स्फोटांमध्ये २५७ नागरीक ठार झाले तर, ७१३ हून अधिक जखमी झाले होते.
पाच ऑगस्ट १९९४ रोजी सीबीआयने नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून याकूबला अटक केली होती. मात्र २८ जुलै १९९४ रोजी नेपाळमध्ये याकूब पोलिसांना शरण आल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता. टाडा न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती पी.डी.कोदे यांनी २००६ मध्ये याकूबला कारस्थान रचणे, मदत करणे, बेकायदा शस्त्रसाठा, दारुगोळा बाळगणे त्याची वाहतूक करणे या आरोपांखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.
याकूबच्या फाशीसाठी ३० जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती. २९ आणि ३० जुलैच्या रात्री याकूबच्या वकिलांनी त्याची फाशी टाळण्यासाठी भरपूर धडपड केली. मात्र न्यायमूर्ती, दीपक मिश्रा, न्यायमूर्ती प्रफुल्ला सी. पंत, न्यायमूर्ती अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने फाशीच्या नियोजित वेळेच्या दोनतास आधी त्याची याचिका फेटाळून लावली होती.
याकूबच्या फाशीसाठी ३० जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती. २९ आणि ३० जुलैच्या रात्री याकूबच्या वकिलांनी त्याची फाशी टाळण्यासाठी भरपूर धडपड केली. मात्र न्यायमूर्ती, दीपक मिश्रा, न्यायमूर्ती प्रफुल्ला सी. पंत, न्यायमूर्ती अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने फाशीच्या नियोजित वेळेच्या दोनतास आधी त्याची याचिका फेटाळून लावली होती.

