मुंबई / अजेयकुमार जाधव
पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि मालमत्तेचे आगी पासून सरक्षण व्हावे म्हणून लावण्यात आलेली अग्निशमन यंत्रे निकामी झाली असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी, एफ दक्षिण यांच्याकडून एफ दक्षिण विभागातील शाळांमध्ये किती अग्निशमन यंत्रे लावली आहेत, किती यंत्रे रिफिल केली आहेत आणि किती यंत्रे निकामी आहेत याची सविस्तर माहिती मागविली होती. याबाबत माहिती देताना एफ दक्षिण विभागात 18 शाळा असून त्यामधे 3 किलोची 18 आणि 160 यंत्रे आहेत. त्यापैकी 3 किलोची 14 आणि 5 किलोची 127 यंत्रे जानेवारी आणि जून 2014 मध्ये रिफिल करण्यात आली आहेत. ही अग्निशमन यंत्रे दर एक वर्षाने रिफिल करणे आवश्यक असते.
रिफिल केलेली काही उपकरणे जानेवारी 2015 मधे निकामी झाली आहेत. तर काही उपकरणे जून 2015 मध्ये निकामी झाली आहेत. तरी अद्याप ही यंत्रे रिफिल करण्यात आलेली नाहीत. अग्निशमन यंत्रे रिफिल केली नसल्याने एफ दक्षिण विभागातील 18 शाळांमधे शिकणारे हजारो विद्यार्थी व शिकवणारे शेकडो शिक्षक यांच्या जिवाशी पालिका आणि शिक्षण विभाग खेळ करत आहे. अग्निशमन उपकरणे निकामी झाली असल्याने पालिकेच्या मालमत्तेचेही नुकसान होण्याची शक्यता असली तरी अधिकारी मात्र गंभीर नसल्याचा आरोप शरद यादव यांनी केला आहे.

