आक्रोश महामोर्चात बौद्ध अल्पसंख्यांक समाजाचे नवे समीकरण
मुंबई / अजेयकुमार जाधव
महाराष्ट्रा मध्ये बौद्धांवर अन्याय अत्याचार वाढत चालले असून काल सोकावत चालला आहे. अन्याय अत्याचार करणाऱ्यांची मिजास वाढली आहे. अन्याय अत्याचार करणाऱ्यांची ताकद वाढली नसून आमच्यातीलच काही लोक सत्तेसाठी लालघोटे घेत असल्याने अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे फावत आहे. आंबेडकरी जनेतेने अश्या लोकांना उघडे पाडायला हवे असे आवाहन मनोज संसारे यांनी केले. अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी सर्व आंबेडकरी जनतेला एकत्र आणून त्याची वज्रमुठ तयार करून जशास तसे उत्तर देवू असा इशारा मनोज संसारे यांनी आझाद मैदान येथील बौद्ध, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक अन्याय अत्याचार विरोधी कृती संमितीच्या वतीने आयोजित आक्रोश महामोर्चाच्या वेळी दिला.
खैरलांजी ते शिर्डी अश्या अनेक प्रकरणात बौद्ध लोकांवर अन्याय अत्याचार करून निर्घुण खून करण्यात आले आहेत. गेल्या ५ वर्षात अनुसूचित जाती जमाती यांच्यावर १० हजारांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बौद्ध, अनुसूचित जाती व आदिवासी यांच्यावर गेल्या ५ वर्षात ३४३ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. नुकताच या जिल्ह्यात सागर शेजवळ या तरुणाचा खून करण्यात आला आहे. या सर्वाचा जाब विचारण्यासाठी आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात बोलताना आमच्या मुलांचे खून आणि आया बहिणींचे बलात्कार होत आहेत सरकार पोलिस राजकारणी आमच्या विरोधात आहेत. अश्यावेळी संमाजातील सर्व घटकांना एकत्र आणून अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने चळवळीला नवी दिशा देण्याचे काम करणार असल्याचे संसारे म्हणाले. आजच्या मोर्चाच्या निमित्ताने बौद्ध दलित मुस्लिम आदिवासी भटक्या समाजातील लोक एकत्र आल्याने सत्ता काबीज करण्याची ताकद आपल्यात निर्माण होत असल्याने आपलेही लवकरच अच्छे दिन येतील असा विश्वास संसारे यांनी व्यक्त केला.
बौद्ध समाजातील काही नेते सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी लाचार झाले आहेत. बौद्धांचे मुडदे पडत असताना काहीना सामाजिक सलोखा परिषद घ्यावीशी वाटते अश्या लोकांना आंबेडकरी जनता कधीही माफ करणार नाही. भारताचे संविधान निर्मात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातू असलेल्या आनंदराज आंबेडकर यांना जिथे मारहाण होते. बाबासाहेबांचे रक्त जिथे सांडले जाते तिथे सामान्य लोकांचे काय हाल असतील याचा विचार करण्याची गरज असल्याचे संसारे म्हणाले. आज आणलेला हा मोर्चा हि फक्त झांकी असून बौद्ध अनुसूचित जाती जमाती यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार न थांबल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा मोर्चा आणू असा इशारा संसारे यांनी यावेळी सरकार आणि पोलिस प्रशासनाला दिला. हा आक्रोश मोर्चा हा कुणाला नेते बनवण्यासाठी नसून अन्याय अत्याचारग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आहे. आपल्याला आपले हक्क मिळवण्यासाठी एकाच निळ्या झेंड्या खाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे एकमेव नेते हे समजून एकत्र यायला हवे. त्यासाठी सर्वांनी आपले हेवे दावे विसरून एकत्र येण्याचे आवाहन संसारे यांनी केले.
कृती समितीचे अध्यक्ष सुधाकर सुराडकर यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात संविधानाच्या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने क्रांती आणायची असल्याचे सांगितले. यावेळी मोर्चाला उपस्थित असलेल्या आमदार महादेव जानकर यांनी मी आपल्या सोबत असून अन्याय अत्याचार थांबण्यासाठी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व वारीस पठाण यांनी बौद्ध आणि मुस्लिम एकत्र आल्यास देशातील राजकारणाची समीकरणे बदलू शकतात. यासाठी बौद्ध आणि मुस्लिमांनी एकत्र यायला हवे असे सांगितले. एमआयएमने बौद्धांवर अन्याय झाल्यावर विधानसभेत आणि लोकसभेत आवाज उचलला असून यापुढेही कुठेही बौद्धांवर अन्याय अत्याचार झाल्यास एमआयएम बौद्धांबरोबर खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेल असे आश्वासन दिले. यावेळी आमदार मिलिंद माने, काका खंबाळकर, गंगाराम इंदिसे, श्यामदादा गायकवाड, सुनील खोबरागडे, आनंद शिंदे, किरण चन्ने, किशोर गजभिये, रमाताई अहिरे, समाधान रावकर, सुनील खांबे इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडून उपस्थित मोर्चेकऱ्याना संबोधीत केले.

