मुंबई / प्रतिनिधी (7/7/2015)
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इकडे तिकडे सगळीकडे भ्रष्टाचार दिसत असल्याचे भाजपाला उद्देशून वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेत किती भ्रष्टाचार आहे याकडेही लक्ष घालावे असा टोला सचिन आहिर यांनी लगावला. मुंबई शहर हे सुंदर आणि स्वच्छ असावे असे बाळासाहेब ठाकरे स्वप्न होते. मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेची गेले २२ वर्षे सत्ता असली तरी बाळासाहेबांचे हे स्वप्न सत्ताधार्यांना पूर्ण करता आलेले नसल्याने सत्ताधारी बाळासाहेबांचे हे स्वप्न कधी पूर्ण करणार असा प्रश्न राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याशी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्या नंतर पत्रकारांशी बोलताना पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय वस्तू मिळाल्या नाहीत हा प्रशासनाचा दोष आहे. प्रशासनाचा दोष असताना अश्या दोषी प्रशासनावर वचक नसलेल्या सत्ताधाऱ्यांचाही दोष असल्याचे अहिर यांनी सांगतले. राज्य सरकारने सामान्य लोकांना परवडतील अशी १० लाख घरे बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई महानगर पालिकेचा डीपी प्ल्यान अजून मंजूर झाला नाही अश्या परिस्थितीत गरिबांना परवडणारी घरे बांधण्यासाठी लागणाऱ्या मंजुरी डीपी प्ल्यान नंतर मिळू शकतात. यामुळे डीपी लवकरात लवकर जाहिर करावा अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे अहिर यांनी सांगितले. मुंबईच्या नाल्यामधील गाळ काढण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी अहिर यांनी केली. मरीन ड्राइव्हवर लावण्यात आलेल्या एलइडी दिव्यांबाबत न्यायालयाने पुन्हा पिवळे दिवे लावण्याचे मत मांडले आहे. न्यायालयाच्या मतानुसार पुन्हा पिवळे दिवे लावले जाणार आहेत. हे पिवळे दिवे लावण्यासाठी ५२ ते ५७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च मुंबईकर जनतेच्या पैशातून न करता एलईडी दिव्यांसाठी आग्रही असणाऱ्या भाजपाच्या नेत्यांच्या क्खीशातून वसूल करावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे अहिर यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मुंबईमध्ये बांधण्यात येणार आहे याचे स्वागत असले तरी मुंबई मधील हेरीटेज वास्तूंना धक्का न लावता बाळासाहेबांचे स्मारक उभारावे असे अहिर यांनी सांगितले. मुंबईकर जनतेच्या कर रूपातून जमा होणाऱ्या महसुलामधील पैसा कोठे खर्च होतो याची माहिती सामन्य मुंबईकर जनतेला व्हावी म्हणून महापालिकेच्या पैशांचा हिशोब संकेतस्थळावर टाकावा तसेच पालिकेच्या उत्पन्न व खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी अहिर यांनी केली.

