मुंबई (प्रतिनिधी) - संजय गांधी निराधार योजनेतून दरदहा ६०० रुपये मानधन दिले जाते. त्यातून विजेच्या बिलापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च भागविणे कठीण होत असल्याची कैफियत मांडत संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ करून दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
आमदार बच्चू कडू आणि किसान संघटनेचे विजय जावंधिया यांच्या नेतृत्वाखाली आज विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांनी मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेचा तपशील त्यांनी सांगितला. संजय गांधी निराधार योजनेतून केवळ दरमहा ६०० रुपये मिळतात. विजेचे बिलच ५०० रुपये आहे. एवढ्याशा तुटपुंज्या पैशात आम्ही काय काय करायचे, असा सवाल लता धाटे यांनी केला. तर आमचा बीपीएलच्या योजनेत समावेश नाही. त्यामुळे योजनेचा लाभच मिळत नाही. आम्ही सर्व प्रकारच्या योजनेपासून वंचित आहोत. किमान आमच्या मुलांच्या शिक्षणाची तरी काळजी घ्यावी, अशी मागणी बेबी वाघ यांनी केली. आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या विधवांना त्या विधवा असल्याचे कार्ड द्यावे. म्हणजे त्यांना सर्व योजनांचा या कार्डमुळे लाभ मिळेल, असे बेबी वाघ म्हणाल्या. तर बँकेच्या अधिकार्यांनी विधवा महिलांना बँकेत बोलावू नये. अधिकार्यांनी स्वत: गावात जावे, अशी सूचना बच्चू कडू यांनी केली.

