मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- वांद्रे पूर्व येथील एम. आय. जी ग्रूप को. ऑप हौ. सोसायटी लि. ग्रूप-१ वांद्रे गावाचा नगरभूमापन क्रमांक ६४९, ६४९ ते ६४९-४८ या भूभागासमोरील नियोजित इमारतीच्या कामात अडचणीची ठरलेली ११३ झाडे कापण्याची तसेच ३३३ झाडांची पुनरोपन करण्याचा प्रस्तावास सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी जोरदार विरोध केला. मात्र कॉंग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादीकडून सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दबाव आल्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सत्ताधारी शिवसेनेचा विरोध डावलून सदर प्रस्ताव मंजूर केला.
संबंधित विकासकाकडून सदर ठिकाणची झाडे कापण्याची तसेच पूनर्रोपन करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडे ६ डिसेंबर २०१४ रोजी परवानगी मागितली होती. आज सदर प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण सभेत आल्यानंतर तृष्णा विश्वासराव यांनी ५० झाडांच्यावर झाडे कापण्याची परवानगी देताना सदर भागास भेट देण्याचा नियम असल्याचे सांगत या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना केली. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे आणि राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी यास जोरदार विरोध करीत सदर प्रस्ताव मंजूर करण्याची आग्रही मागणी केली.
