तापामुळे मुंबईत सहा जण दगावले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तापामुळे मुंबईत सहा जण दगावले

Share This

वातावरणातील बदलाचा फटका मुंबईकरांना बसू लागला असून तापाच्या रुग्णांत मागील काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. याच तापामुळे सहा जण दगावल्याचे समोर आले आहे. १० ऑगस्टपर्यंत तापाच्या रुग्णांची संख्या २,२५९ इतकी होती. अवघ्या सहा दिवसांत २,१४६ नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा आता ४,४०५ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.

यातील अनेक रुग्ण हे भायखळा, परळ, कांदिवली, बोरिवली, ग्रँट रोड आणि कामाठीपुरा परिसरातील आहेत. सहा मृतांपैकी एकाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही माहिती उघड होईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईकरांना वातावरण बदलामुळे हिवताप, गॅस्टो आणि टायफॉईडसारख्या आजारांचा त्रास होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत मलेरियाच्या रुग्णांचा आकडा २०५ वर होता. त्यात १७५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा ३८० वर पोहोचला आहे. तसेच डेंग्यू आणि लेप्टोसारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांतही वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ३३ तर लेप्टोचे २१ नवीन रुग्ण आढळून आले.
स्वाईन फ्लूचे ३४४, गॅस्ट्रोचे ५०७ तर कॉलराच्या २ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच टायफॉईडच्या रुग्णांत वाढ होत असून ४७ रुग्ण आढळून आल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या साथरोग नियंत्रण कक्षातील रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
स्वाईन फ्लूमुळे आणखीन एकाचा मृत्यू
मुंबईत स्वाईन फ्लूमुळे आणखीन एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूमुळे मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. गुरुवारी दिवसभरात ५६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ऑगस्टमध्ये रुग्णांचा आकडा ३४४ वर पोहोचला आहे. गोरेगावमधील एका ६४ वर्षीय वृद्धाचा १५ ऑगस्टला खासगी रुग्णालयात हृदयप्रक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला.  ठाण्यात राहणाऱ्या एका ५८ वर्षीय व्यक्तीचा सेव्हन हिल्स रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. गोवंडीतील १३ वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडल्याने १० ऑगस्टला त्याला नायर रुग्णालयात दाखल केले होते.
वैद्यकीय तपासणीत त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले. अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूचा सर्वाधिक धोका असल्याने पालिकेने ६-७ महिन्यांच्या गर्भवतींसाठी तीन प्रसूतिगृहात स्वाईन फ्लूची मोफत लस देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ११६ गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूची लस देण्यात आली आहे. लेप्टो व स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या कर्मचा-यांकडून झोपडपट्टीत ४२० घरांमध्ये जाऊन १७८७ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages