महापालिकेच्या भाडेकरारांतर्गत असणा-या भूखंडांवरील पुनर्विकास प्रक्रियेसाठी अर्ज करणे होणार सुलभ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेच्या भाडेकरारांतर्गत असणा-या भूखंडांवरील पुनर्विकास प्रक्रियेसाठी अर्ज करणे होणार सुलभ

Share This
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारितील भाडेकरारांतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांवरील इमारतींकरिता पुनर्विकास प्रक्रिया राबवायची झाल्यास किंवा सदर भूखंडांचा विकास करावयाचा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा आस्थापनेला मध्यस्थांची मदत न घेता अर्ज करणे शक्य व्हावे, या उद्देशाने अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रामुख्याने अर्ज नमुन्याचे सुलभीकरण व अर्ज केल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण होण्याबाबत निश्चित कालमर्यादा असणे, याबाबींचा समावेश आहे. 

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांशी संबंधित विविध अर्जांच्या मसुद्यांचे सुलभीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यानुसार महापलिकेच्या भाडेकराराअंतर्गत असणा-या भूखंडांवर पुनर्विकास प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधितांना अर्ज करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने मालमत्ता खात्याशी संबंधित अर्ज नमुन्यांच्या मसुद्यांचे सुलभीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे.  या अंतर्गत प्रस्तवित मसूदे महापलिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यावर ३ सप्टेंबर २०१५ पर्यंत नागरिकांनी त्यांच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या मालमत्ता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महापलिकेच्या मालमत्ता (इस्टेट) खात्याच्या अखत्यरितील भाडेकराराअंतर्गत असणा-या भूखंडांबाबत पुनर्विकास करण्यासाठी सध्या आवश्यक असणारा दोन पानी ‘एबीसी’ अर्ज नमुना रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्याऐवजी आता कामाच्या स्वरुपानुसार प्रत्येकी केवळ एका पानाचे अत्यंत सुस्पष्ट व सोप्या भाषेतील पाच अर्ज नमुने प्रस्तावित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या अर्ज नमुन्यांमध्ये अर्जासोबत जोडावयाच्या किमान कागदपत्रांचा संक्षिप्त तपशिल व संबधित विहित शुल्कांची माहिती देखील प्रस्तावित अर्ज नमुन्यात असणार आहे.  त्याचबरोबर प्रस्तावित अर्ज नमुन्यानुसार अर्ज केल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेशी संबंधित अंदाजित कालावधी देखील प्रस्तावित करण्यात आला असून त्यानुसार प्रक्रियेशी संबंधित कालमर्यादा निश्चित केली जाणार आहे.

वरील तपशिलानुसार मालमत्ता खात्याशी संबंधित ५ अर्ज नमुन्यांचे मसुदे महापालिकेच्याwww.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याबाबत नागरिकांनी त्यांच्या सूचना दिनांक ३ सप्टेंबर २०१५ पर्यंत ac.estate@mcgm.gov.in या इ-मेल पत्त्यावर अथवा खालील नमूद पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन महापलिकेद्वारे करण्यात आले आहे:

सहाय्यक आयुक्त (मालमत्ता)
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय
चौथा मजला, विस्तारीत इमारत
फोर्ट मुंबई- ४०० ००१

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages