मुंबई / प्रतिनिधी 25 August 2015
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात पाउसाने पाठ फिरवल्याने पावसाला संपत आला तरी तलाव भरलेली नाहीत. मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावामधे पाणी साठा कमी असल्याने बुधवारी स्थायी समिती बैठकीत 20 टक्के पाणी कपातिची घोषणा केली जाणार आहे.
मुंबईला दरवर्षी 14 लाख 50 हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. या वर्षी ऑगस्ट महीना संपत आला तरी 25 ऑगस्टरोजी सर्व तलावामधे 9 लाख 42 हजार 372 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा उपलब्ध आहे. हा पाणी साठा मुंबईकर नागरिकांना 254 दिवस पुरेल इतकाच आहे. मागील वर्षी (2014) याच दिवशी तलावामधे 13 लाख 28 हजार 930 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा होता. मागील याच दिवशी मुंबईकर जनतेला 359 दिवस पुरेल इतका पाणीसाठा होता. मागील वर्षा पेक्षा या वर्षी कमी पाणी साठा असल्याने आणि मुंबईकराना वर्षभर पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध नसल्याने सध्या उपलब्ध असलेला पाणी साठा वर्षभर पुरेल या उद्देशाने पाणी कपात करणार आहे. मुंबई मधे सरसकट 20 टक्के पाणी कपात करण्याची घोषणा करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबईमधे या आधीही पाणी कपात झाली होती. त्या वेळी नागरीकाना 10 टक्के आणि व्यावसायिकाना 20 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. याच धर्तीवर मुंबईमधे चालू वर्षीही पाणी कपात करण्याचा निर्णय पालिका अधिकारयांच्या बैठकीत झाल्यांचे समजते. नागरीकाना 10 टक्के पाणी कपात लागू केली जाणार असताना व्यावसायिक वापर करणार्या होटेल, कंपन्या, बिल्डर, बंद बाटल्यातून पाणीपुरवठा करणार्या कंपन्या याना 20 टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. तसा प्रस्ताव बुधवारी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला गेला असून स्थायी समिती बैठकीत या पाणी कपातीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
