मानखुर्दमधील १.२५ लाख वीज ग्राहकांना दिलासा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मानखुर्दमधील १.२५ लाख वीज ग्राहकांना दिलासा

Share This
मुंबई : खाजगी वीजवितरण करणार्‍या रिलायन्स एनर्जी या कंपनीने मुंबई उपनगरातील आपल्या १.२५ लाख ग्राहकांना नव्या उच्च दाब वीज संग्रहणाच्या केंद्राची स्थापना करत दिलासा दिला आहे. यामुळे रिलायन्सचे पुरवठा क्षेत्रातील ७७ वे व पूर्व उपनगरातील २३ वे ३३ / ११ केव्ही क्षमतेचे उच्च दाब वीज संग्रहण केंद्र मानखुर्द येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे पूर्व उपनगराच्या वीज क्षमतेत ३0 मेगावॅट अँम्पियर्सची वाढ होणार असून त्याचा लाभ कंपनीच्या शिवाजी नगर, छेडा नगर, टिळक नगर, बैंगनवाडी, देवनार आणि मानखुर्द या विभागातील सुमारे सव्वा लाखा ग्राहकांना होणार आहे.

याबाबत रिलायन्स एनर्जीच्या प्रवक्त्याने सांगितले की, वीज वितरण प्रणालीच्या सुधारणांचा एक भाग म्हणून हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील ग्राहकांना दज्रेदार व अखंडित वीज पुरवठा मिळू शकणार असून वाढत्या वीज मागणीचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. रिलायन्स एनर्जी पूर्व उपनगरात चुनाभट्टी ते मानखुर्द व विक्रोळी या परिसरात वीज पुरवठा करत असून या विभागाची मागणी वीज मागणीच्या २५ टक्के आहे. गेल्या काही वर्षांत मानखुर्द आणि तेथील आजूबाजूच्या परिसर झपाट्याने विकसित होत असून वीज मागणीतही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. या वीज केंद्राचे पूर्ण संचालन कंपनीच्या गोरेगाव येथील अत्याधुनिक स्काडा नियंत्रण कक्षातून होणार आहे. रिलायन्स एनर्जीचे सध्या २९ लक्ष ग्राहक असून त्यांची वीज मागणी १८१८ मेगावॅट आहे. कंपनीचे वीज वितरण जाळे हे मुंबईतील मोठे वीज वितरण जाळे असून त्यात २१ हजार किमी लांबीच्या उच्च व कमी दाब वाहिन्या, ८ अति उच्च दाब संग्रहण केंद्र आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages