अँम्ब्युलन्सला वाहतुकीचा ग्रीन कॉरिडॉर - अँम्ब्युलन्स वॉच टॉवरचे उद््घाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अँम्ब्युलन्सला वाहतुकीचा ग्रीन कॉरिडॉर - अँम्ब्युलन्स वॉच टॉवरचे उद््घाटन

Share This
मुंबई : वाहतूक कोंडीत अडकलेल्या अँम्ब्युलन्समधील रुग्णाच्या जीवावर बेतू नये, यासाठी अँम्ब्युलन्सला वाहतुकीचा ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून वाशी येथील टोल नाका येथे उभारण्यात आलेल्या अँम्ब्युलन्स वॉच टॉवरचे उद््घाटन रविवारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. आपल्या या संकल्पनेला सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतानाच, अन्य टोल नाक्यांवरही हा कल्पक उपक्रम राबवण्याची सूचना त्यांनी केली.
मुंबईत अलीकडेच हृदयरोपण शस्त्रक्रियांसाठी दोन वेळा वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉरचा प्रयोग यशस्वीरीत्या राबवण्यात आला होता. मात्र, दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठिकठिकाणी अँम्ब्युलन्सना रुग्णांना वेळेत रुग्णालयांमध्ये घेऊन जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. वाहनचालकांना इच्छा असूनही वाहतूक कोंडीमुळे अँम्ब्युलन्सना पुढे जाण्यासाठी वाट करून देता येत नाही. टोल नाक्यांपाशीही अनेकदा हा अनुभव येतो. त्यामुळे टोल नाक्याजवळ एक उंच टॉवर बांधून त्यामाध्यमातून येणारी अँम्ब्युलन्स दूरवरूनच हेरून तिच्यासाठी एक लेन मोकळी ठेवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

आपल्या संकल्पनेला शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून रुग्णांना याचा मोठा लाभ होईल. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी एक एक क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण यामुळे वाचू शकतील, असे सांगतानाच, आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार या उपक्रमाची अंमलबजावणी लवकरच अन्य टोल नाक्यांवर करण्यात येईल, असे शिंदे या वेळी म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages