उच्च शिक्षणात एससी,एसटीतील युवकांचे प्रमाण कमी - राज्यपाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उच्च शिक्षणात एससी,एसटीतील युवकांचे प्रमाण कमी - राज्यपाल

Share This
मुंबई : ३० ऑगस्ट २०१५
उच्च शिक्षणाकडे जाणार्‍या लोकांचे प्रमाण देशात २0 टक्क्यांहून अधिक वाढले आहे, मात्र त्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीतील युवकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वकष प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही वर्गांतील युवकांचा सरकारी तसेच खाजगी नोकर्‍यांमधील टक्का वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी केले.
चेंबूर येथील श्री नारायण मंदिर समिती या मल्याळी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक संस्थेने संत व समाजसुधारक नारायण गुरू यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. आजच्या घडीला उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक खाजगी विद्यापीठे सुरू होत आहेत; परंतु तेथील शिक्षण गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या पार्श्‍वभूमीवर नारायण मंदिर समितीसारख्या गरीब व उपेक्षित वर्गासाठी काम करणार्‍या शैक्षणिक संस्था अधिक बळकट करणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. जातीभेद, अंधश्रद्धा व असमानता यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध नारायण गुरू आयुष्यभर लढले. त्यांनी दिलेली एक जात, एक धर्म, एक देव ही शिकवण चिरकाल प्रासंगिक असून जागतिक शांती व समेष्टीसाठी मंत्र ठरू शकते, असे राज्यपाल म्हणाले. या वेळी राज्यपालांनी मल्याळम समाजाला ओणमच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक सत्यम अंतिकाड, केरळ पशुधन विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू बी. अशोक, नारायण मंदिर समितीचे अध्यक्ष एम. आय. दामोदरन, एन. शशिधरन व सचिव सलिमकुमार उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages