मुंबई: २४ अॉगस्ट
महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या आम्हा महिलांचे आंदोलन निपटून काढण्यासाठी जेवढी तत्परता दाखवता तेवढी तत्परता महागाई नियंत्रणात आणण्याच्या मुद्द्यावर दाखवा. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीने टोक गाठलेले असताना सरकार निष्क्रिय कसे, हेच का तुमचे अच्छे दिन? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्ष मा. सौ. चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केला आहे. कांदा, डाळी यासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या गगनाला भिडलेल्या दरांवर नियंत्रण आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्या विरोधात सोमवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार होते. मात्र त्याची कुणकूण सरकारला लागल्याने हे आंदोलन होण्यापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. सरकारच्या या कृतीचा निषेध करत त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महागाईच्या विरोधातल्या या निषेध आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या "सोन्याच्या भावाशी स्पर्धा करणाऱ्या' कांद्याचे पोते भेट म्हणून देण्यात येणार होते. त्यासाठी सकाळच्या सुमारास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. श्री. धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या गोळा होण्यास सुरूवात झाली. मात्र या आंदोलनाच्या बातमीने घाबरलेल्या राज्य सरकारने पोलीसांना आदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्य सरकारच्या या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने निषेध केला आहे. याबाबत बोलताना सौ. चित्रा वाघ म्हणाल्या की,सध्या कांदा प्रति किलो ८० रुपयांवर गेला आहे. डाळीने तर केव्हाच शंभरी गाठली आहे. सर्वसामान्य मात्र या दरवाढीमुळे होरपळून निघत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून व्यापारी आणि दलालांचे असल्याने महागाईवर नियंत्रण आणण्यात सरकारला कोणतेच स्वारस्य नाही. महागाईचे चटके जसे सर्वसामान्यांना बसत आहेत तसेच ते मंत्र्यांच्या आणि सत्ताधारी आमदारांच्या गृहिणींनाही बसत असतील. त्यामुळे अशा मंत्री महोदयांच्या गृहिणींनाही आमचे सांगणे आहे की, महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी काहीतरी कृती करण्याची प्रेरणा आपल्या पतीराजांनाही द्या. तसेच आमचे आंदोलन आता जरी सरकारने निपटून काढले असले करी भविष्यातही महागाईच्या मुद्द्यावर निष्क्रिय राहिल्यास यापेक्षाही जोरदार आंदोलने करण्यात येतील असा इशाराही मा. सौ.चित्रा वाघ यांनी दिला. या आंदोलनात सौ. चित्रा वाघ यांच्या सोबत उमा भास्करन, वंदना माने, सोनल पेडणेकर, मनिषा गांगण, शितल कदम, तारा मालवणकर, कामिनी जाधव, फहमिदा खान आणि सुनिता क्रॅस्टो यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

