मुंबई – मागील वर्षभरात रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांवर होणा-या हल्ल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. रात्रपाळीत काम करणारे रुग्णालयातील महिला कर्मचारीही अशा घटनांमुळे असुरक्षित असल्याने केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांत ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील प्रत्येक गोष्टींवर आता सीसीटीव्हीची नजर राहाणार आहे.
आतापर्यंत राज्यभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत २२ निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून अमानुष मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. जुलै २०१५ मध्ये तीन डॉक्टरांना मारहाणीची घटना घडली होती. राज्यभरातील निवासी डॉक्टरांवर वारंवार होणा-या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) रुग्णालयाचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले होते. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात आवश्यक सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकांसंदर्भातील अहवाल २५ जुलै रोजी सादर करण्याचे निर्देश डीएमईआरने दिले होते. परंतु ऑगस्ट महिना संपत आला तरी १४ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी केवळ तीनच महाविद्यालयांनी ऑडिट अहवाल सादर केला आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयांत सीसीटीव्ही बसवण्याबाबत काही महिन्यांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक रुग्णालयांत सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावरील वॉर्ड, विभाग व आवारावर सीसीटीव्हीचे लक्ष राहणार आहे. सीसीटीव्हीवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व पालिका रुग्णालयांच्या मुख्य संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली.
